“आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने जगा!” – प्रा. गणेश शिंदे

0
308

पिंपरी, दि. २९ (पीसीबी ) “दु:ख प्रत्येकाच्या वाट्याला येते; पण त्यावर मात करून छोट्या गोष्टींमधून आनंद शोधा अन् आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने जगा!” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांनी पेठ क्रमांक २७/अ, निगडी प्राधिकरण येथे रविवार, दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी केले. स्वामी विवेकानंद मित्रमंडळ आणि माजी नगरसेविका शर्मिला बाबर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘हे जीवन सुंदर आहे!’ या विषयावरील व्याख्यानात प्रा. गणेश शिंदे बोलत होते. माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत उर्फ बाळा शिंदे, राजेंद्र बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. गणेश शिंदे पुढे म्हणाले की, “माणसाने जगताना गतकाळाकडे किती बघायचे आणि किती पुढे चालायचे याबाबत तारतम्य हवे. “अवघाचि संसार सुखाचा करीन…” असे म्हणत ज्ञानेश्वरमाउलींनी अवघ्या विश्वासाठी पसायदान मागितले. सर्वसामान्य माणूस देवाकडे आपल्या स्वतःसाठी अन् फारतर कुटुंबीयांसाठी मागणे मागतो. आपले सुख आणि दुःख हे तुलनेवर अवलंबून असते. एखाद्या गोष्टीमुळे आपण आनंदी झालो तरी तीच गोष्ट दुसऱ्याला मोठ्या प्रमाणावर मिळाली आहे हे कळल्यावर आपण लगेच दु:खी होतो. वास्तविक जीवनात आनंदी राहणे खूप सोपे आहे; पण आनंद स्वतः उपभोगण्यापेक्षाही तो जगाला दाखविण्यासाठी माणसे केविलवाणी धडपड करतात. बाह्य गोष्टींमध्ये आनंद शोधण्यापेक्षा स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बघा. चंचल मनाला स्थिर केल्याशिवाय शाश्वत आनंद गवसत नाही. निसर्ग, समाज आणि अर्थकारण हे तीन घटक आनंदनिधान आहेत. निसर्गापुढे माणूस खूप क्षुल्लक आहे, ही बाब कोविडने आम्हाला शिकवली. त्यामुळे निसर्गासोबत स्वतःला जुळवून घ्या. जात, धर्म, पंथ विसरून समाजाशी नाते जोडा. डोळ्यांत प्रेम अन् हृदयात वात्सल्य असल्याशिवाय माणूस म्हणून जगता येणार नाही. जीवनात पैसा महत्वाचा असला तरी नाती जपायला शिका. घरातील वृद्धांना अन्नाइतकीच संवादाची भूक असते, हे लक्षात घ्या. जोपर्यंत व्यक्ती जीवंत आहे, तोपर्यंतच तुमचा स्पर्श, तुमचे प्रेम त्याला कळते. मृत्यूपश्चात औपचारिक गोष्टींना काहीच किंमत नाही. ज्यावेळी तुम्हाला नात्यांमधील गोडवा कळेल, त्यावेळेपासून जीवन सुंदर आहे हे लक्षात येईल. त्यामुळे नाती जपा आणि जीवन सुंदर करा!” ज्ञानेश्वरमाउली, जगद्गुरू तुकोबाराय, कबीर, स्वामी विवेकानंद, कवयित्री बहिणाबाई चौधरी, डॉ. नितू मांडके असे विविध संदर्भ उद्धृत करीत अतिशय ओघवत्या वक्तृत्वशैलीतून प्रा. गणेश शिंदे यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

व्याख्यानानंतर सार्थक फरांदे या चिमुकल्या मुलाने प्रा. गणेश शिंदे लिखित “काय सांगू राणी मला गाव सुटेना…” या गीताचे सादरीकरण करून रसिकांची वाहवा मिळवली. व्याख्यानापूर्वी, सकाळी स्वामी विवेकानंद मित्रमंडळ आणि जयभवानी तरुण मंडळ यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सुमारे १३० बाटल्या रक्त संकलित केले.

स्वामी विवेकानंद मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. अक्षय शेळके यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.