इलेक्ट्रिक वाहन निर्मात्या कंपनीकडून डीलरची फसवणूक

0
527

चूक लक्षात आणून देणाऱ्या डीलर विरोधात कारवाई करण्यासाठी दबाव

चिंचवड, दि. २८ (पीसीबी) – वाहनाबाबत खोटी आणि चुकीची माहिती देत व्यावसायिकाची फसवणूक केली. जास्त क्षमतेच्या बॅटरी दुचाकिमध्ये वापरून आरटीओ कार्यालयाची देखील फसवणूक केल्याचे या प्रकरणात उघडकीस आले आहे. याप्रकरणी कंपनीच्या दोन संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 15 डिसेंबर 2021 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत चिंचवड येथे घडला.

त्रिलोक धर्मराज यादव, धर्मराज कांताप्रसाद यादव (रा. चाकण) अशी गुन्हा दाखल झालेल्या कंपनीच्या संचालकांची नावे आहेत. याप्रकरणी योगेश सुरेश सेठीया (वय 49, रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी सेठिया यांनी एक डिसेंबर 2021 रोजी रेयांश इलेक्ट्रिक व्हेईकल कंपनी त्यांच्या पत्नीच्या नावे रजिस्टर केली. या कंपनीचे शोरूम त्यांनी एम्पायर इस्टेट चिंचवड येथे सुरू केले. दरम्यान खेड तालुक्यातील कुरुळी येथील एक्झरवेल प्रायव्हेट लिमिटेड या दुचाकी इलेक्ट्रिक वेहिकल कंपनीशी त्यांनी संपर्क केला. कंपनीच्या संचालकांशी त्यांनी शोरूम सुरू करण्याबाबत व्यवहार केला.

सेटिया यांनी व्यवहार केला त्यावेळी एक्झर्व्हेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे तीन संचालक होते. त्यामध्ये प्रदीप कटारिया, त्रिलोक यादव आणि धर्मराज यादव यांचा समावेश होता. सेटिया यांनी लाखो रुपये खर्च करून शोरूम सुरू केले. दरम्यान, प्रदीप कटारिया आणि त्रिलोक यादव यांच्यामध्ये वाद झाला. कटारिया यांनी कंपनीचे संचालक पद सोडून दिले. त्याबाबत त्यांनी सेटिया यांना फोनवरून कळविले. आता कंपनीचे त्रिलोक यादव आणि धर्मराज यादव हे दोन संचालक होते. सेटिया यांनी कटारिया यांच्याशी ओळख असल्याने त्यातून डीलरशिप घेतली होती. मात्र कटारीया हे कंपनीतून बाहेर पडल्याने सेटिया यांनी कंपनीकडे डीलरशिप नको असल्याचे कळविले. त्यानंतर कंपनीने त्यांचे तीन लाख रुपये डिपॉझिट चेक द्वारे परत दिले.

त्यानंतर काही दिवसांनी कंपनीने पुन्हा सेटिया यांना डीलरशिप घेण्याचा आग्रह केला. यावेळी सेटिया यांच्याकडून कोणतेही डिपॉझिट न घेता कंपनीने पूर्वीची डीलरशिप सुरू केली. सेटिया यांनी कंपनीकडून कमी वेगाच्या एकूण सात दुचाकी विक्रीसाठी चिंचवड येथील शोरूम मध्ये ठेवल्या होत्या. त्यांनी गाड्यांच्या विक्रीकरिता मॅनेजर आणि स्टाफ देखील ठेवले होते. 15 मे 2022 रोजी दुचाकी खरेदीसाठी आलेले ग्राहक दीपक जैद यांनी गाडीची ट्रायल घेतली आणि कमी वेगाची गाडी असून देखील ती ताशी 50 किलोमीटर वेगाने धावत असल्याचे दिसून आले. याबाबत ग्राहकाने सेटिया यांना आणि सेटिया यांनी कंपनीला कळविले.

त्यावर कंपनीचे संचालक त्रिलोक यादव यांनी सेटिया यांना मेल करून ही चूक दाखवून दिल्याबद्दल आभार मानले. तसेच आमच्या कंपनीच्या गाड्या आरटीओ मध्ये नोंदणी न करता विक्री करू शकता, अशी माहिती दिली. गाडीच्या वेगाबाबत कोणतीही समाधानकारक माहिती फिर्यादी यांना मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी 23 मे 2023 रोजी पुणे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तक्रार केली.

या गाड्यांचा वेग जास्त असल्याने शासनाच्या नियमानुसार त्यांचे आरटीओ पासिंग करणे आवश्यक होते. तरी देखील कंपनी फिर्यादी यांना बेकायदेशीरपणे ग्राहकांना वाहनांची विक्री करण्यास सांगत होती. अशाप्रकारे शासनाची फसवणूक न करता आपण वाहन विक्री करणार नसल्याची भूमिका फिर्यादी यांनी घेतली. तसेच त्यांनी कंपनीचे मॅनेजर राकेश मोरे यांना फोनवरून सांगितले. फिर्यादी कंपनीमध्ये तक्रार करण्यासाठी गेले असता संचालकांनी फिर्यादी यांना भेटणे टाळले. तसेच कंपनीचा कोणताही जबाबदार प्रतिनिधी शोरूम मध्ये पाठवला नाही.

सेटिया यांनी त्यांच्या शोरूम मध्ये असलेल्या दुचाकी कंपनीला परत घेण्यास सांगितले. मात्र कंपनीने 28 मे 2022 रोजी सेटिया यांनी दुचाकी मध्ये छेडछाड केल्याचा आरोप केला. तरी देखील सेटिया हे सातत्याने कंपनीकडे पाठपुरावा करत होते. त्यामुळे 18 जून 2022 रोजी कंपनीचा मेकॅनिक सेटिया यांच्या शोरूम वर आला. त्याने वाहनाची तपासणी केली. मात्र वाहनाच्या वेगाबाबत कोणताही पर्याय काढला नाही आणि तो निघून गेला. त्यानंतर कंपनीने पाच जुलै 2022 रोजी सेटिया यांची डीलरशिप रद्द केली.

त्यानंतर सेटिया यांनी 27 फेब्रुवारी 2023 रोजी हडपसर येथील साज टेस्ट प्लांट प्रायव्हेट लिमिटेड या टेस्टिंग कंपनीत वाहनाची तपासणी केली. त्यामध्ये संबंधित इलेक्ट्रिक दुचाकीला 800 वॅटची मोटर असल्याने दुचाकीचा वेग जास्त असल्याचे निदर्शनास आले. शासनाच्या नियमानुसार कमी वेगाच्या वाहनांना 250 वॅटच्या मोटार असणे बंधनकारक आहे अशी देखील टेस्टिंग कंपनीने माहिती दिली.

सेटिया यांची डीलरशिप रद्द झाल्याने त्यांना पुन्हा कंपनीसोबत संपर्क करता आला नाही. त्यामुळे कंपनीच्या दुचाकी त्यांच्या शोरूम मध्ये पडून राहिल्या. त्या दुचाकींमध्ये 800 वॅटची मोटार असल्याने त्या हाय स्पीड असल्याने ग्राहकांची व शासनाची फसवणूक न करता त्या विक्री न करण्याचा निर्णय सेटिया यांनी घेतला. यामध्ये सेटिया यांचे 20 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत त्यांनी न्यायालयात दाद मागितली असता न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.