इंडिया आघाडीचा बट्याबोळ, ममता, भगवंसिंग मान नंतर नितीशकुमारांची वेगळी भूमिका

0
104

नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) – विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे निवडणुकीआधीच तीन तेरा वाजले असून पश्चिम बंगाल आणि पंजाबपाठोपाठ बिहारमध्ये या आघाडीचे बारा वाजण्याची नामुष्की येऊन ठेपली आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या तेजस्वी प्रसाद यांना मुख्यमंत्री करा, नाही तर आम्ही भले आणि आमचा पक्ष भला, असा टोकाचा इशारा लालू प्रसाद यांच्याकडून सध्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना गेला आहे. नितीश कुमार या प्रस्तावाला राजी होतील असे वाटत नाही. प्रसंगी ते इंडिया आघाडीशी काडीमोड घेऊन पुन्हा भाजपप्रणीत एनडीएकडे जातील, अशी जोरदार दिल्लीच्या राजकीय वर्तुळात केली जात असून बिहारच्या या घडामोडींकडे भाजपचे बारीक लक्ष आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपसाठी पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि बिहार या तीन राज्यात इंडिया आघाडीचे इंजिन सुरू होण्यापूर्वी बंद करणे गरजेचे होते आणि तसेच वारे या राज्यांमध्ये वाहत आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर लालूप्रसाद यादव त्यांच्या पुत्राला म्हणजेच तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी दबाव आणत आहेत आणि याच कारणामुळे 31 जानेवारीआधीनितीश कुमारइंडिया आघाडीपासून वेगळे होतील, अशी भीती बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन रामकुमार मांझी यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या शक्यतेने दिल्लीच्या राजकीय वर्तुळात नितीश कुमार भाजपच्या दिशेने सरकत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

नितीश कुमार लालू प्रसाद यादव यांच्यावर दबाव निर्माण करण्यासाठी भाजपसोबत जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करतात असं म्हटलं जातं होतं. तर दुसऱ्या बाजूला लालू प्रसाद यांची सुद्धा भाजपबरोबर बोलणी सुरू असल्याचे बोलले गेले. राज्यात एकाच सरकारमध्ये असून नितीश आणि लालू यांच्यात विसंवाद असेल तर तो भाजपला हवाच आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना राजदला बिहारची गादी हवी आहे.

“लालू प्रसाद यादव यांचं एकच ध्येय आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनवावं आणि मी नितीश कुमार यांच्याबरोबर जेवढं काम केलं आहे, त्यावरुन मला असं वाटतं की ते कोणत्याही परिस्थितीमध्ये तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री करणार नाही. दोघांचे मार्ग अगदी पूर्व-पश्चिम असे आहेत. अशा परिस्थितीमध्ये दोघांचं जुळून येणं अशक्य आहे. तिसरा पर्याय बिहारच्या राजकारणात पाहायला मिळू शकतो. तिसरा पर्याय हाच अशू शकतो की बिहारच्या हितामध्ये नीतीश कुमार एनडीएशी जवळीक करु शकतात,” असं माझी यांचे मत आहे. एका मुलाखतीत त्यांनी बिहारच्या सध्याच्या राजकारणाचे पदर उलगडून दाखवल्याने थंडीच्या मोसमात राजकीय वातावरण तापले आहे.

बिहारच्या गादीला सुरुंग लावायचा हा भाजपचा मास्टर स्ट्रोक आता यशस्वी होताना दिसत आहे. लालू यांना फुस लावून नितीश यांना अस्वस्थ करायची भाजप ही चाल बरोबर ठरली तर इंडिया आघाडी जवळपास संपली असेच म्हणायला हवे. मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माझी यांनी दोन गोष्टी सांगितल्या होत्या. पहिली गोष्ट म्हणजे कर्पूरी ठाकुर यांना भारतरत्न दिला जाईल आणि दुसरे म्हणजे बिहारमध्ये राजकीय भूकंप होईल. पहिली खरी झाली आणि दुसरी होण्याच्या मार्गावर आहे.

इंडिया आघाडीसाठी पश्चिम बंगाल, बिहार, महाराष्ट्र, पंजाब ही राज्ये महत्वाची आहेत. मात्र आता पश्चिम बंगाल, पंजाब हातातून गेल्याने बिहारवर भरवसा होता. ही राज्ये सुद्धा आता हातातून निसटून चालल्याने इंडिया आघाडीची परिस्थिती नाजूक होत चालली आहे. महाराष्ट्र आता बाकी असले तरी भाजप आघाडीत कधीही बिघाडी करू शकते.