मनोज जरांगे आणि शासन संघर्षाची नांदी, आझाद मैदानावर परवानगी नाकारली…

0
307

लोणावळा, दि. २५ (पीसीबी) – आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी निघालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांच्या वतीने नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी यासंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. कोणत्याही परिस्थितीत माघार नाही, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्याने आता शासन आणि आंदोलक असा संघर्ष अटळ असल्याचे सांगण्यात आले.

माझा समाज आरक्षणासाठी मुंबईला चालला आहे. तोडगा निघावा म्हणून आम्ही इथं लोणावळ्यात थांबलो होतो. तोडगा निघावा ही आमची भूमिका आहे, त्यामुळे आम्ही थांबलो होतो. मात्र सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या चर्चेदरम्यान कुठलाही तोडगा निघालेला नाही, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी लोणावळ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
सकाळी लोणावळ्यातून मुंबईच्या दिशेने सर्व आंदोलक निघाले आहेत. लोणावळ्यात सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या चर्चेदरम्यान कुठलाही तोडगा निघाला नाही, त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेने निघण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारचं आणखी मोठं शिष्टमंडळ येणार आहे ते आलं की रस्त्यात त्यांच्यासोबत चर्चा करु आणि काय ते ठरवू, असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली त्यावर आता मनोज जरांगे पाटील काय करणार, याची सर्वांना प्रतिक्षा होती. जरांगे यांनी तत्काळ भूमिका स्पष्ट केली आणि मुंबईच्या दिशेने कूच कऱण्याचे आदेश आंदोलकांना दिले. मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी नाकारलं आहे. ते म्हणाले आम्हाला परवानगी भेटलेली आहे, आमच्या लोकांनी आझाद मैदानावर तयारी देखील सुरु केली आहे. तिथं स्टेज उभं केलं जातंय त्यामुळे परवानगी वगैरे नाकारली हे काही खरं नाही.
मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी आता शिष्टमंडळ पाठवू नका, त्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी चर्चेसाठी यावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. दरम्यान, मी आझाद मैदानावरच आंदोलन करणार, असं
म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद संपवली