जैश-ए-मोहम्मद च्या धमकीनंतर अयोध्येत हाय अलर्ट

0
184

अयोध्या, दि. २० (पीसीबी) – अयोध्येत नव्याने बांधल्या जाणाऱ्या राम मंदिरात सोमवारी (२२ जानेवारी) श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. राम जन्मभूमी ट्रस्टने या सोहळ्याची जय्यत तयारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशभरातील अनेक दिग्गजांना या सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. उत्तर प्रदेश पोलीस आणि केंद्रीय संरक्षण यंत्रणांनी या सोहळ्याच्या सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त केला आहे. दरम्यान, पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने शुक्रवारी रात्री या मंदिरावरून धमकी दिली आहे. जैशने म्हटलं आहे की, “निर्दोष मुसलमानांच्या हत्येनंतर या मंदिराचं उद्घाटन केलं जात आहे.” जैशच्या या टिप्पणीनंतर अयोध्या हाय अलर्टवर आहे. दरम्यान, सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणाांमधील सूत्रांनी सांगितलं की, संपूर्ण परिस्थिती आपल्या नियंत्रणात आहे. तरीदेखील या टिप्पणीनंतर सावधानता बाळगली जात आहे.

२६ जानेवारी रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यानिमित्त देशाची सुरक्षाव्यवस्था आधीपासूनच हाय अलर्टवर आहे. दरम्यान, संरक्षण विभागातील सूत्रांनी जैशच्या या टिप्पणीला निरर्थक मानलं आहे. हे वक्तव्य जरी ‘जैश..’चं असलं तरी त्यामागे पाकिस्तानची आयएसआय ही संस्था असू शकते. जैश त्यांचंच प्रतिनिधित्व करते.

जैशने अयोध्येतील राम मंदिराबाबत धमकी देताना म्हटलं आहे की, या मंदिराची परिस्थिती ‘अल अक्सा मशिदी’सारखी होईल. अल अक्सा मशीद (जेरुसलेम) हे मुस्लीम समुदायासाठी जगातलं तिसरं सर्वात पवित्र स्थान आहे. सध्या जॉर्डन हा देश या मशिदीची व्यवस्था पाहतो. गैर मुस्लिमांना या मशिदीत जाण्याची परवानगी आहे. परंतु, ते तिथे प्रार्थना करू शकत नाहीत.

एका बाजूला संरक्षण यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. तर दुसऱ्या बाजूला अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सोमवारी दुपारी १२.१५ ते १२.४५ दरम्यान मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. श्री रामजन्मभूमी ट्रस्टने तब्बल ७,००० हून अधिक लोकांना या सोहळ्याचं निमंत्रण पाठवलं आहे.