मनोज जरांगे पाटील जालना जिल्ह्यापासून मुंबईच्या दिशेने रवाना

0
229

मुंबई, दि. २० (पीसीबी) – मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज जालना जिल्ह्यापासून मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले आहे. सरकारशी अनेकदा चर्चा होऊनही मार्ग न निघाल्यामुळे सदर आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर घेऊन जाण्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली. याबाबत आज शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर बोलत असताना शरद पवारांनी मनोज जरांगे पाटील यांच्या एका आरोपाचा हवाला देऊन त्यांना आश्वासन देणारे ते दोन मंत्री कोण? याबाबतचा सवाल उपस्थित केला. ते दोन मंत्री आता समोर का येत नाहीत? असेही शरद पवार म्हणाले. यावेळी रोहित पवार यांना ईडीकडून मिळालेल्या नोटीशीचाही शरद पवार यांनी उल्लेख केला.

शरद पवार यांनी आज सोलापूर येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपली भूमिका विशद केली. ते म्हणाले, “मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडविण्यासाठी दोन मंत्री त्यावेळी गेले होते. त्या दोन मंत्र्यांनी काही आश्वासने दिली होती. ती आश्वासने पाळली गेली नाहीत, असे दिसत आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी माझे उपोषण सोडवायला जे मंत्री आले होते, ते आज पुढे का येत नाहीत? असा सवाल जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला होता. याचा अर्थ त्या बैठकीत काहीतरी आश्वासन दिले गेले होते, ही शक्यता नाकारता येत नाही.”

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगेंना लोकसभा निवडणूक लढविण्याची विनंती केली आहे. याबद्दल शरद पवार यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, प्रकाश आंबडेकरांच्या विनंतीवर मी बोलणे योग्य होणार नाही.

शरद पवार गटाचे तरूण नेते आमदार रोहित पवार यांना ईडीने चौकशीसाठी बोलाविले आहे. २४ तारखेला चौकशीला हजर व्हावे, अशी नोटीस रोहित पवार यांना देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला. त्यावर ते म्हणाले की, विरोधी पक्षातील अनेकांना ईडीची नोटीस आलेली आहे. संजय राऊत आणि अनिल देशमुख यांना तर अटकही झाली होती. एका शिक्षण संस्थेला देणगी मिळाली म्हणून अनिल देशमुख यांना तुरुंगात टाकण्यात आलं. शेवटी न्यायालयाने त्यांची सुटका केली. संजय राऊत यांनी सरकारविरोधात लिहिलं म्हणून त्यांना तुरुंगात टाकलं.

शरद पवार पुढे म्हणाले, “ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणेचे हत्यार विरोधकांच्या विरोधात वापरले जात आहे. सत्तेचा पुरेपूर गैरवापर सुरू आहे. सरकारच्या धोरणांशी सहमत नसलेल्या लोकांना लक्ष्य करायचे आणि त्यांना जेरीस आणण्याचा कार्यक्रम सुरू आहे. हा एकट्या रोहित पवारचा प्रश्न नाही. सगळ्याच विरोधकांचा आहे. त्यामुळे न्यायालयात लढाई लढणं हे आमच्या हातात असून ते आम्ही करत राहू.”