अजितदादांनी पोलीस आयुक्तांना सुनावले खडे बोल

0
240

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कोणाची मुलाहिजा ठेवत नाही. आपल्या रोखठोक स्वभावामुळे ते ओळखले जातात. चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना अजित पवार यांनी खडेबोल सुनावले. राजकीय कार्यक्रम असताना पत्रकारांना त्या नेत्यांपर्यंत पोहचू दिले जात नाही. त्यांना लांब ठेवले जात आहे. मागील आठवड्यामध्ये पिंपरीत उपमुख्यमंत्री अन् गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आयुक्त विनयकुमार चौबे यांना सांगितले होते. त्यानंतर पुन्हा तोच प्रकार घडला. यावेळी सर्व माध्यमांच्या पत्रकारांनी अजित पवार यांना याबाबत सांगितले. त्यानंतर अजित पवार यांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना बोलवून खडे बोल सुनावले. त्यांनी विनय कुमार चौबे यांना चांगलेच फैलावर घेतले.

पिंपरी-चिंचवड शहरात राजकीय नेत्यांच्या दौऱ्यावेळी पत्रकारांची पोलीस अडवणूक करत आहेत, असे वारंवार समोर आलेले आहे. गेल्या आठवड्यामध्ये राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना समोरासमोर बोलवून सांगितले. त्यानंतर आज पुन्हा तोच प्रकार घडला.

शनिवारी अजित पवार यांचा पिंपरी-चिंचवड शहरातील रामकृष्ण मोरे नाट्यगृहात कार्यक्रम पार पडला. त्यानंतर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी त्यांचा बाईट घेण्यासाठी पुढे सरसावले. परंतु पोलिसांनी पत्रकारांना अडवले. यामुळे पुन्हा एकदा पिंपरी- चिंचवड पोलीस प्रसारमाध्यमांच्या पत्रकारांची अडवणूक करत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

अजित पवार यांच्याकडे पत्रकारांनी हा विषय मांडला. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांच्या समोरच पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना बोलवून चांगलेच खडेबोल सुनावले. पत्रकारांचा तो अधिकार आहे. त्यांना अडवू नये, संबंधित नेते बोलायचे की नाही ते ठरवतील असे म्हणत त्यांनी विनयकुमार चौबे यांना फैलावर घेतले.