तुळजापूर, दि. १९ (पीसीबी) : तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाला गुरुवारपासून (ता. १८) सुरवात झाली. देवीची शेजघरातील निद्रिस्त मूर्ती पहाटे सिंहासनावर अधिष्ठित करण्यात आली. सकाळी सहा ते सकाळी नऊपर्यंत नित्योपचार अभिषेक झाले. देवीला वस्त्रालंकाराचा पेहराव करण्यात आला. दर्शनासाठी भाविकांची वर्दळ सुरू होती. उत्सव २५ जानेवारीपर्यंत चालेल. विविध कार्यक्रम होतील.
शाकंभरी नवरात्रोत्सवाचे यजमान विनोद सोंजी, त्यांच्या पत्नी अनुराधा सोंजी यांनी देवीचे दश॔न घेतले. त्यानंतर सवाद्य मिरवणुकीने मंदिरापासून गोमुख तीर्थकुंडापर्यंत जाऊन जलकुंभाची पूजा केली. सवाद्य मिरवणुकीने जलकुंभ मंदिरातील गणेशविहार परिसरात आणण्यात आला. तेथे घटस्थापना झाली. यजमान सोंजी दांपत्याच्या हस्ते गणेशपूजन, वरूणपूजन, कलशपूजन आदी धार्मिक विधी झाले.
मंदिर समितीचे सरव्यवस्थापक सोमनाथ माळी, धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, विश्वास कदम, जयसिंग पाटील, महंत तुकोजीबुवा, महंत हमरोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, भोपे मंडळाचे अध्यक्ष अमर परमेश्वर, पुजारी मंडळाचे उपाध्यक्ष विपिन शिंदे, उपाध्ये मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो, किशोर गंगणे, सचिन अमृतराव, बाळासाहेब भोसले आदी उपस्थित होते.
धार्मिक कार्यक्रम सुरू
तुळजाभवानी मंदिरात दुर्गासहस्त्रनाम, भवानीसहस्त्रनाम, दुर्गासप्तशती, नवग्रहजप आदींसह विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरवात झाली. २५ जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रम होतील. दरम्यान, तुळजाभवानी मंदिरात दरवर्षी एका मंडळास शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या यजमानपदाचा मान मिळतो. यंदा भोपे मंडळाकडे यजमानपद आहे.