आदित्य ठाकरेंना मोठा धक्का, खिचडी घोटाळाप्रकरणी सूरज चव्हाण यांना अटक

0
167

मुंबई, दि. १८ (पीसीबी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणखी एक धक्का बसला आहे. बीएमसी खिचडी घोटाळाप्रकरणी सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. ईडीनं सूरज चव्हाण यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. खिचडी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात येत होती. त्यानंतर ईडीकडून सूरज चव्हाण यांची चौकशी करण्यात आली होती. आज ईडीनं सूरज चव्हाण यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. ईडीची ही कारवाई ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

सूरज चव्हाण यांची खिचडी घोटाळा प्रकरणी यापूर्वी ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. ईडीकडून आज सूरज चव्हाण यांना अटक केली असून उद्या त्यांना विशेष पीएमएलए कोर्टात हजर करुन ईडी कोठडी मागितली जाईल. ईडी आता उद्या पीएमएलए कोर्टात काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल.

सूरज चव्हाण हे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. शिवसेना ठाकरे गटाकडून काल घेण्यात आलेल्या जनता न्यायालयाच्या कार्यक्रमावेळी सूरज चव्हाण तिथं हजर होते. काल वरळी येथील जनता न्यायालय या महा प्रेस कॉन्फरन्स मध्ये सुरज चव्हाण उपस्थित होते. पहिल्या रांगेत खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्यासोबत ते बसलेले होते.

एकेकाळी आदित्य ठाकरे यांच्यासोबत काम करणाऱ्या आणि सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेत असलेल्या अमेय घोले यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी केवळ सत्याचा विजय असं म्हटलं आहे. या ट्विटचा संदर्भ सूरज चव्हाण यांच्या अटकेशी लावला जात आहे.

भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी देखील सूरज चव्हाण यांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिलेली आहे. “कोविड लॉकडाऊन खिचडी घोटाळ्यात ईडीनं आदित्य ठाकरे यांचे फ्रंटमॅन सूरज चव्हाणची अटक केली आहे, मी त्याचे स्वागत करत आहे. संजय राऊत मित्र परिवाराच्या खात्यात खिचडीचे पैसे गेले. उद्धव ठाकरेंच्या सेनेच्या नेत्यांनी ऑक्सिजन, कोविडचं कफन खाल्लं,रेमडेसीव्हीर खाल्लं, खिचडी खाल्ली, उद्धव ठाकरेंना सगळ्या कोविड घोटाळ्याचा हिशोब द्यावा लागणार”,असं किरीट सोमय्या म्हणाले.