आता ५४ लाखावर सगेसोयऱ्यांनाही कुणबी दाखले मिळणार

0
188

जालना, दि. १६ (पीसीबी) – ज्या ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना २० जानेवारीपर्यंत प्रमाणपत्र द्या, आरक्षण मिळालं तर गुलाल घेऊन मुंबईला जाऊ आणि नाही मिळालं तर ते घेण्यासाठी मुंबईला जाऊ असं सांगत आपल्या मुंबईच्या आंदोलनावर ठाम असल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे. तर नोंदी मिळालेल्यांच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार असल्याचं आश्वासन राज्य सरकारने दिलं आहे. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची भेट घेतली आणि त्यांना मराठा आरक्षणाचा नवीन मसूदा दिला.

आमदार बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी मनोज जरांगेंची भेट घेत त्यांना मराठा आरक्षणाचा नवा ड्राफ्ट सादर केला आहे. नव्या ड्राफ्टनुसार कुणबी नोंदी आढळलेल्या रक्ताच्या नात्यातील सग्यासोयऱ्यांना तसंच इतर मागासवर्गीयांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार असल्याचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलंय. तर सरकारने दिलेल्या मसुद्याचा अभ्यास करु असं मनोज जरांगे यांनी सांगितलं. तसंच ५४ लाख नोंदी मिळालेल्या सग्यासोयऱ्यांनाही प्रमाणपत्र दिले तर गुलाल घेऊन मुंबईला जाऊ अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिलं आहे. त्यामुळे मनोज जरांगे आपल्या मुंबई दौऱ्यावर ठाम आहेत हे स्पष्ट झालंय.

जरांगेंनी मुंबईला येऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांनी येत्या २२ जानेवारीपासून मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यासाठी त्यांचे नियोजनही सुरू झालं आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये समावेश करावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेणार असल्याचं या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी मुंबईत येऊ नये यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून आमदार बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे हे नवीन मसुदा मंगळवारी अंतरवाली सराटी येथे आले आणि त्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्यावेळी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र देण्यात टाळाटाळ होत असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला.

नवीन मसूदा जरांगेंना दिला
बच्चू कडू यांच्याकडून एक अधिसूचनेचा मसूदा मनोज जरांगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. आता जरांगे त्यांच्याकडून त्यावर अभ्यास करण्यात येणार आहे. या सर्व बाबी वेळेत करता आल्या असत्या असं म्हणत ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत अशा ५४ लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचं तातडीने वाटप करा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. कुणबी नोंदी आढळलेल्या रक्त संबंधांतील सोयऱ्यांना, स्व जातीतील विवाह झालेल्या सग्या-सोयऱ्यांना भटक्या,अनुसूचित जाती जमाती तसेच इतर मागासवर्गीयांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार असल्याची माहिती आहे. बुधवारपासून दोन दिवस शिबीर घेऊन प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जातीच्या दाखल्याचे अर्ज घेतले जातील. या संबंधी तक्रारीसाठी टोल क्रमांक जाहीर केल्या जाईल असं आश्वासन आमदार बच्चू कडू यांनी दिलं आहे.

आरक्षण मिळालं तर गुलाल घेऊन मुंबईला जाऊ
आरक्षण मिळाला तरी मुंबईला जाणार आणि नाही मिळाला तरी मुंबईला जाणार असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे. प्रत्येक वेळी तेच लिहून आणतात आणि तेच बदलतात असा आरोपही त्यांनी केला. मनोज जरांगे म्हणाले की, ज्या ५४ लाख मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत त्यांना लगेच प्रमाणपत्र द्या, त्यांच्या सर्व सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या. प्रमाणपत्र वाटप झाल्याशिवाय मसुद्याला अर्थ नाही. ५४ लाख नोंदी मिळालेला सगळ्यांना 20 तारखेच्या आत प्रमाणपत्र तुम्हाला द्यावे लागणार आहेत, तर तुमच्या मसुद्यावर आम्ही विचार करू, आरक्षण मिळाला तरी मुंबईला जाणार आणि नाही मिळालं तरी मुंबईला जाणार. आरक्षण मिळालं तर गुलाल घेऊन जाऊ, नाही मिळालं तर आम्ही आरक्षण आणायला मुंबईला जाऊ.