विनायक मेटेंचा शिवसंग्राम महायुतीतून बाहेर, स्वतंत्रपणे लढणार

0
108

पुणे, दि. १७ (पीसीबी) : महायुतीत सहभागी झालेल्या घटक पक्षांची संख्या चारवरून आता 11 झाली असून सत्तेत केवळ तीनच पक्ष आहेत. उर्वरित घटक पक्षांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे, याकडे भाजपने लक्ष दिले पाहिजे, अशी अपेक्षा शिवसंग्राम संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठ अशी शिवसंग्रामची सुरुवातीपासून भूमिका राहिली असून आजही आम्ही भाजपसोबत आहोत, असे शिवसंग्राम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी सांगितले. गेल्या विधानसभा निवडणुकीत आम्ही भाजप बरोबर निवडणूक लढविली होती.

त्यावेळी आमचे दोन उमेदवार विजयी झाले होते. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसंग्राम संघटनेने तीन जागा लढविण्याचा निश्चय केला असून या जागा नक्की कोणत्या असतील त्याची माहिती आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर दिली जाईल.

तळागाळातील माणसांपर्यंत शिवसंग्राम संघटना पोहोचली असून गेल्या काही वर्षांमध्ये सामाजिक संघटना म्हणून कामे मार्गी लावली आहेत. आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय शिवसंग्रामने घेतला असून यासाठी भाजपबरोबर चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर या जागा कोणत्या असतील,त्यावर शिक्कामोर्तब होईल.

लोकसभेबरोबरच विधानसभेच्या जागादेखील आम्ही लढवणार असून बीड विधानसभा बरोरबरच 12 जागा लढविण्याची तयारी आमची असल्याचे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी सांगितले. गेल्या निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत जादा जागा लढणार आहे.

महायुतीत सहभागी असलेल्या घटक पक्षांनादेखील त्यांच्या ताकदीनुसार पदे, विविध महामंडळे यावर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली पाहिजे, अशी अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली. शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक दिवंगत आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे बीड विधानसभेची जागा लढविणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.