टीडीआर घोटाळ्या प्रकरणी गुरुवारी संभाजी ब्रिगेड करणार धरणे आंदोलन

0
117

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेचा वाकडमधील टीडीआर घोटाळा उघडकीस येऊन महिनाभराचा कालावधी उलटला आहे. तरी देखील यात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. या निषेधार्थ महापालिका प्रशासना विरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने येत्या गुरुवारी महापालिकेसमोर “धरणे आंदोलन” करण्यात येणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतिश काळे यांनी दिली आहे.

    याबाबत सतिश काळे यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाकडमधील टीडीआर घोटाळ्यामुळे महापालिकेचे तब्बल दीड हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे महानगरपालिकेची राज्यात मोठ्या प्रमाणात बदनामी झाली. यासंदर्भात गेल्या महिनाभरापासून तक्रारी करून देखील यात दोषी असणारे अधिकारी तसेच या संपूर्ण गैरकारभाराचे मुख्य सूत्रधार नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड यांच्यावर अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे भ्रष्ट प्रसाद गायकवाड यांना पाठीशी घालणाऱ्या पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ गुरुवार दि.18-01-2024 रोजी सकाळी 11:00 वाजता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आऊट गेट वर संभाजी ब्रिगेडच्या वतीने संविधानिक मार्गाने "धरणे आंदोलन" करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे