जेवणावेळी हातात दोन लाडू दिसल्याने शिक्षकाची विद्यार्थ्याला बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण

0
152

पालघर, दि. १६ (पीसीबी) -पालघर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका शासकीय आश्रम शाळेत एका विद्यार्थ्याला दोन लाडू घेतले म्हणून शिक्षकाने बेदम मारहाण केली. मोखाडा तालुक्यातील जव्हार आदिवासी प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या कारेगाव शासकीय आश्रम शाळेत हा प्रकार उघडकीस आला. नववीत शिकणाऱ्या रुद्राक्ष पागीला बेशुद्ध पडेपर्यंत शिक्षकाकडून मारहाण करण्यात आली. शिक्षकाविरोधात तक्रार करू नये म्हणून पालकांवरही दबाव टाकला जात असल्याचा रुद्राक्षाच्या आईचा आरोप आहे.

विद्यार्थी बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण
सोमवारी दुपारी एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील आदिवासी कुटुंबांशी संवाद साधला. तर दुसऱ्या बाजूला एका शासकीय आश्रम शाळेत एका विद्यार्थ्याला दोन लाडू घेतले म्हणून शिक्षकाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा विद्यार्थी बेशुद्ध पडेपर्यंत या निर्दयी शिक्षकाने त्याला काठीने मारहाण केली. अधीक्षक आल्यानंतर या विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मोखाडा तालुक्यातील कारेगाव येथील शासकीय आश्रम शाळेत नववीत शिकणाऱ्या रुद्राक्ष दत्ता पागी याला ही मारहाण करण्यात आली ललित अहिरे या शिक्षकांनी ही मारहाण केल्याचं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आलं आहे.

रुद्राक्ष जेवण घेण्यासाठी गेला त्यावेळेस त्याच्या हातात दोन लाडू होते. याचा जाब विचारत रुद्राक्षला या शिक्षकाने बेदम मारहाण केली. मात्र, रुग्णालयात दाखल झाल्यानंतर शिक्षकांविरोधात तक्रार करू नये म्हणून पीडित विद्यार्थ्याच्या आई वडिलांवर शिक्षकांकडून दबाव आणला जात होता. या सगळ्या धक्कादायक घटनेमुळे शासकीय आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

पालघर जिल्ह्यात जव्हार आणि डहाणू हे दोन आदिवासी विकास प्रकल्प असून या दोन आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत शेकडो आश्रम शाळा आहेत. या सर्वांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असून यांच्या सुरक्षिततेकडे आदिवासी विकास प्रकल्प नेहमीच दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट आदिवासी विकास प्रकल्प पाहतंय का? असा सवाल उपस्थित केला जातोय.