मुंबई, दि. १५ (पीसीबी) – मुंबई काँग्रेसमधील सर्वात महत्त्वाच्या नेत्यांपैकी असलेलेले नेते मिलिंद देवरा यांनी काल काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना पक्षात प्रवेश केला. मिलिंद देवरा यांच्या शिवसेना प्रवेशाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मिलिंद देवरा यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केल्याने काँग्रेसला मुंबईत मोठं खिंडार पडलं आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांनी नुकतंच आगामी 10 ते 15 दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याचं भाकीत वर्तवलं होतं. त्यामुळे मिलिंद देवरा यांचा शिवसेना प्रवेशाची घटना ही या भूकंपाला सुरुवात तर नाही ना? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरु आहे. विशेष म्हणजे गिरीश महाजन यांनी पुन्हा तसंच राजकीय भूकंपाचं वक्तव्य केलं आहे. याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु असताना आता सूत्रांकडून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.
मिलिंद देवरा यांच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर अनेक काँग्रेस आमदार आणि पदाधिकारी शिवसेनेच्या वाटेवर आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल दिला. त्यानंतर जवळपास 6 ते 7 काँग्रेस आमदार शिवसेनेत येण्यास तयार आहेत. याबाबत गुप्त बैठका देखील पार पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश होऊ शकतो, असे संकेत सूत्रांनी दिली आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. आगामी काळात लोकसभेच्या निवडणुकीचं बिगूल वाजणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. प्रत्येक पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघांच्या गोटात जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहेत.
भाजपप्रणित एनडीएच्या विरोधात विरोधकांची इंडिया आघाडी रणनीती आखत आहे. पण असं असताना काँग्रेसमधील 6 ते 7 आमदारांनी खरंच शिवसेनेत प्रवेश केला तर सत्ताधाऱ्यांची ताकद वाढू शकते. तसेच काँग्रेस पक्षाचं मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे काँग्रेस आपल्या पक्षाला एकसंघ ठेवण्यात यशस्वी ठरतो का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.