४३५ कोटींचे कमिशन आणि शरद पवार यांची शिकार – थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
501

शिकार टप्प्यात आली की बार टाकायचा असतो, असे दिवंगत माजी मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांचे विधान सर्वश्रृत आहे. भाजपने त्यात थोडासा बदल केलाय. जर का शिकार टप्प्यात येत नसेल तर ती यावी म्हणून प्रथम हाकारे द्यायचे, ढोल-नगारे वाजवायचे. कोणी किती वजनदार असो, कर्तृत्ववान असो त्याला बदनाम करून सोडायचे आणि आपल्या पायाशी आणायचे. अशा पध्दतीने आपसूक शिकार जाळ्यात ओढायची किंवा बार टाकायचा. गेल्या पाच वर्षांत असे शेकडो रथीमहारथी भाजपच्या तंबूत आलेत. नावांची जंत्री मोठी आहे. राजकारणातील हे तंत्र आता पाचवी- सातवीत शिकणाऱ्या शेंबड्या पोरालाही समजते. भाजपचे जेष्ठ नेते आणि पेशाने सीए असलेले माजी खासदार किरीट सोमय्या हे स्वतः शिकारी नाहीत, ते फक्त हाकारे द्यायचे काम करतात. शिकारी दिल्लीत मचानावर बसून आहेत. नरेंद्र मोदी-आमित शाह हे दोघेच सगळा खेळ करतात. देवेंद्र फडणवीस आणि सोमय्या फक्त शिकार आणून द्यायचे काम करतात.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर एका जाहीर सभेत दस्तुरखुद्द मोदी अत्यंत खळबळजनक आरोप करतात. ७० हजार कोटींच्या घोटाळ्यावर ते बोलतात आणि भोळेभाबडे देशवासीय तोंडात बोट घालतात. दोनच दिवसांत अजित पवारांची शिकार होते, म्हणजे राष्ट्रवादी फुटते आणि भाजपला जाऊन मिळते. जे अजित पवार मोदी यांच्यावर एकेरी भाषेत बोलायचे तेच सहा महिन्यांत मोदींशिवाय देशाला पर्याय नाही, असे ठोकून बोलतात. दगडाला शेंदूर फासून देव ज्यांनी केले त्या काकांनाही वय झाले की घरी बसायचा सल्ला देतात. भाजप हा चमत्कार रातोरात कसा करते. राष्ट्रवादीचे तमाम नेते ईडी च्या जाळ्यात अडकतात आणि पक्ष सोडून भाजपबरोबर पाट लावतात. राष्ट्रवादीवरचे ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचे पुढे काय झाले, आता त्यावर ना सोमय्या बोलत ना मोदी. हे सगळे कथानक वाचल्यावर आता शिवसेना का फुटली, कोणी फोडली, कशी फुटली ते अधिक सांगायची गरज नाही.

आज निमित्त झाले ते शरद पवार यांच्यावर केलेल्या दुसऱ्या आरोपांचे. सोमय्या यांनी पिंपरी चिंचवड येथे माध्यमांशी बोलताना अगदी गंभीर आरोप केलेत. ते म्हणतात, कोविड काळात पवार यांचा वसुलीचा धंदा सुरू होता. पवार कुटुंबातील प्रतापराव पवार यांच्या ‘न्यू स्टार इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचा बारा वर्षांत एका दमडीचाही व्यवसाय झालेला नाही. मात्र, अचानक मार्च २०२१ मध्ये ‘सिरम इन्स्टिट्यूट’च्या बँक खात्यातून ४३५ कोटी रुपये शरद पवार परिवारातील प्रतापराव पवार यांच्या या कंपनीत आले आहेत. हे सिरम कडून आलेलं कमिशन तर नाही ना ? असा प्रश्न उपस्थित करत दिल्लीला जाऊन याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. सबळ पुराव्याशिवाय मी बोलत नाही, असे सोमय्या छातीठोकपणे सांगतात. प्रश्न असा आहे की, सोमय्यांनी कितीही गंभीर आरोप केले तरी लोक आता त्यांच्याकडे गांभिर्याने पाहात नाहीत. ४३५ कोटींचे कमिशन असेल तर ते निश्चितच अत्यंत गंभीर प्रकऱण आहे. कारवाई व्हायलाच पाहिजे. पण, जिथे ७० हजार कोटींच्या आरोपांचे गेल्या दीड वर्षांत काहीच झालेले नाही, जिथे उध्दव ठाकरे, नारायण राणे, अशोक चव्हाण, संजय राऊत, छगन भुजबळ, अजित पवार, कृपाशंकर सिंह, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रिफ, प्रताप सरनाईक, अनिल परब, मिलिंद नार्वेकर अशा रथीमहारथींच्या प्रकऱणांचे काहीच झाले नाही तिथे या ४३५ कोटींच्या कमिशनचे काय लोणचं घालायचं का ??? खरे तर, मोठ्या पवारांची म्हणजे शरद पवारांची शिकार होता होत नाही. भाजपला राष्ट्रवादीचे फक्त एकटे अजित पवार आणि त्यांचे ४५-५० आमदार, तीन खासदार नकोत. जे हातातोंडाशी आलेले डाव पलटवू शकतात ते शरद पवार पाहिजेत. ते जुगाड जमत नाही म्हणून हे ४३५ कोटींचे प्रकऱण आहे. आजवरची सर्व प्रकऱणे पाहिली तर तोच संशय आहे. उद्या शरद पवार यांनी मान तुकवली तर, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील, अजित पवार मुख्यमंत्रीसुध्दा होतील. नंतर ४३५ कोटींचा आरोप निव्वळ राजकीय होता म्हणून सोमय्या मूग गिळून बसतील. सोमय्यांची ही दलाली लोकांच्याही लक्षात आली. शिवसेनेचे संजय राऊत रोखठोक बोलतात म्हणून त्यांचे तोंड दिसते. मोदींना पर्याय म्हणून तमाम भाजप विरोधातील पक्षांना एकत्र करून इंडिया आघाडीची स्थापना आणि एकास एक उमेदवार देण्यासाठी आज शरद पवार अक्षरशः विळ्या भोपळ्यांची मोट बांधताहेत. तो प्रयोग यशस्वी होणार की नाही ते काळ ठरवेल, पण भाजपला तोच डाव उधळून लावायचा आहे म्हणून शरद पवार पाहिजेत.

राष्ट्रवादीचे ४५ आमदार फुटून भाजपच्या कळपात सामिल झाले, पण ६० वर्षे राजकारण कोळून प्यायलेले शरद पवार तसूभरही डगमगले नाहीत. मोदी-शाह हे शिंदे-फडणवीस यांच्या माध्यमातून आज वाट्टेल ते करतात. पवार यांची रसद बंद कऱण्यासाठी त्यांच्या सर्व फायनान्सर कंपन्यांवर ईडी, इन्कम टॅक्सचे छापे झाले. जयंत पाटील यांच्या पासून पवार खांदानातील पाहुणेरावळ्यांवर चौकशीचे शुक्लकाष्ट लावले गेले. मागे अजित पवार यांच्या सर्व बहिणींच्या घरी छापे टाकले होते, त्याचे काय झाले ते समले नाही. आता अजित पवारच भाजपच्या वळचणीला गेल्याने ते प्रकरण फाईलबंद झाले. शरद पवारांसारखी मोठी शिकार जाळ्यात येत नाही म्हणून त्यांचे कुटुंब फोडून झाले. काका पुतण्यांची झुंज लावण्याचा प्रयत्न सुरूच आहे. सह्य्याद्रीच्या सारखे टणक बनलेले शरद पवार आणि त्यांचे मोजकेच मावळे शरण न जाता लढायची भाषा करत आहेत. तमाम मराठी जनतेला उध्दव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल दुप्पट सहानुभूती मिळत आहे. हा गलिच्छ खेळ आणखी किती काळ चालणार माहित नाही, पण त्यात भाजपची प्रतिमा मलिन होते हे विसरून चालणार नाही. खरोखर या सर्व भ्रष्ट मंडळींना जेलची हवा खायला लागली असती आणि त्यांची बेहिशेबी मालमत्ता सरकार जमा झालीच असती तर जनतेने मोदी-शाह यांची पूजा बांधली असती. प्रत्यक्षात हे सरळ सरळ ब्लॅकमेलिंग आहे. ४३५ कोटी कमिशनचे सोमय्या आज बोलतात उद्या शरद पवार यांची शिकार झालीच तर सोमय्याच पवार यांचे गोडवे गातील. या ४३५ कोटींचे म्हणने काय, ते आता लोकांनीच ठरवावे. घोडे मैदान जवळ आहे