पिंपरी, दि. १५ (पीसीबी) -पिंपरी चिंचवड पोलिसांनी तडीपार केलेल्या गुंडाला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी शस्त्रासह अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 14) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास करण्यात आली. करण कुमार जाधव (वय 26, रा. लक्ष्मीनगर, मोशी) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी भोसरी पोलीस परिसरात गस्त घालत असताना हवालदार वस्ती मोशी येथे तडीपार केलेला गुंड शस्त्रासह आला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संशयित रिक्षाचा पाठलाग केला. पोलीस आपल्या मागावर असल्याचे लक्षात येताच रिक्षातील दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सीताफिने त्यातील एकास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्टन आणि एक जिवंत काढतोस आढळून आले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या करण जाधवकडे चौकशी केली असता त्याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी तडीपार केले असल्याचे निष्पन्न झाले. तो पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता शहरात आला. त्याच्यावर भोसरी, एमआयडीसी भोसरी, निगडी, विश्रांतवाडी, चाकण, पिंपरी पोलीस ठाण्यात 20 गुन्ह्यांची नोंद आहे.












































