“समाजातील मोठी माणसे दीपस्तंभासारखी!” – प्रा. प्रवीण दवणे

0
268

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) “समाजातील मोठी माणसे दीपस्तंभासारखी असतात. त्यांच्यामुळे वातावरण संस्कारी होते; पण समाजमाध्यमांमुळे बदललेल्या काळात ते विकारी झाले आहे. अशा परिस्थितीत मराठी भाषा आणि संस्कृतीची चिंता वाटते!” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे यांनी आकुर्डी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे रविवार, दिनांक १४ जानेवारी २०२४ रोजी व्यक्त केले. भाषा अकॅडेमी आणि अक्षरभारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘दीपस्तंभ मनातले जनातले’ या कार्यक्रमाचे सादरीकरण करताना प्रा. प्रवीण दवणे बोलत होते. भाषा अकॅडेमीचे अध्यक्ष दीपक पागे, अक्षरभारतीचे अध्यक्ष प्रा. माधव राजगुरू, ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले यांची व्यासपीठावर; प्रा. डॉ. अविनाश सांगोलेकर, नितीन हिरवे, प्रदीप गांधलीकर, प्रा. डॉ. धनंजय भिसे, चंद्रकांत धस यांच्यासह साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.

श्रीकांत चौगुले यांनी, “अनौपचारिकपणे आपण मातृभाषा शिकतो; पण अन्य भाषा जाणीवपूर्वक शिकाव्या लागतात. आजच्या काळात त्रिभाषासूत्री बरोबरच परकीय भाषा शिकणे अनिवार्य झाले आहे; कारण त्यामुळे उच्चशिक्षणाच्या, नोकरी आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतात. ” अशी माहिती दिली. शिल्पा पागे यांनी प्रास्ताविकातून भाषा अकॅडेमीच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त संस्थेची वाटचाल कथन केली.

‘दीपस्तंभ मनातले जनातले’ या कार्यक्रमाचा प्रारंभ करताना प्रा. प्रवीण दवणे यांनी, “कुणीतरी मला विचारलं परकीय भाषा कशी शिकावी? मी म्हटलं त्या भाषेतील पोरीच्या प्रेमात पडावं…” या कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या मार्मिक कवितेच्या ओळी उद्धृत करीत श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद मिळवली. ते पुढे म्हणाले की, “कोणत्याही भाषेची मुळाक्षरे जीवनात मुरावी लागतात, तेव्हाच भाषा अवगत होते. माझ्या लहानपणी आचार्य अत्रे, ना. सी. फडके असे सिद्धहस्त साहित्यिक नियतकालिकांचे संपादक होते. “घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात…” ही कविता शिकवताना बाई डोळे का पुसत होत्या, हे कळायचं आमचं वय नव्हतं. आईवडिलांनी वाचनाचे संस्कार केले. विद्यार्थिदशेत पु. ल. देशपांडे यांना पत्र लिहिले. उत्तरादाखल पु. लं.नी मिस्कील पत्रोत्तर पाठवले होते. पुढील काळात पु. लं. ची मुलाखत घेण्याची सुवर्णसंधी लाभली. शाळेत प्रमुख पाहुणे म्हणून बा. भ. बोरकर यांचे पहिले दर्शन घडले; तर पुढे त्यांच्यासोबत काव्यवाचनाची संधी मिळाली. इंदिरा संत यांनी ‘आकाश’ आणि ‘आभाळ’ या दोन शब्दांचे नेमके अर्थ समजावून सांगितले. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर कुसुमाग्रज यांची भेट घेतली. ज्ञानपीठप्राप्त अमृता प्रीतम यांनी दिलेला आशीर्वाद आणि पुस्तकं अजून जपून ठेवली आहेत. माझ्या गीताच्या दोन ओळी लतादीदी यांनी गाव्यात, अशी उत्कट इच्छा होती; ती पूर्ण झाली. तसेच टीकेला कसे सामोरे जायचे याची शिकवण दीदींनी दिलीच; याशिवाय दु:खाच्या प्रसंगी मला सावरले. जीवनात अनेक साहित्यिक, कलावंत भेटलेच पण विशेष मुलांच्या संस्थेत भेटलेल्या पालकांनी अंतर्मुख केले. अनेकदा रक्तदान करणाऱ्या एका दांपत्याला भेटून खूप प्रभावित झालो. अकस्मातपणे झालेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या अल्पकालीन भेटीतून त्यांच्या सुसंस्कृत, नर्मविनोदी व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय आला. वैयक्तिक जीवनातील दुःख पचवून अफाट यश संपादन करणाऱ्या आशा भोसले यांनी कोणताही साहित्यिक, प्रतिभावंत आणि कलावंत हा दु:ख पचविल्याशिवाय आणि संघर्ष केल्याशिवाय समाजासाठी दीपस्तंभ ठरत नाही, ही शिकवण दिली!” विनोदी किस्से, यमक, उपमा, अलंकार यांची पखरण करीत सुभाषितवजा वाक्यांची रेलचेल असलेल्या कथनशैलीने प्रा. प्रवीण दवणे यांनी रसिकांची मने जिंकली.

वेदान्त आणि नैतिक या शालेय विद्यार्थ्यांनी जर्मन भाषेतून सादर केलेल्या स्वागतगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान भाषा अकॅडेमीच्या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. नेहा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले; तर आभार प्रीती गायतोंडे यांनी मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.