पवनाथडी जत्रा पिंपरी चिंचवड शहराची एक परंपरा बनली – अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील

0
388

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – पवनाथडी जत्रेशी शहरातील अनेक महिलांच्या भावना जोडलेल्या आहेत. त्यांच्यासाठी ही जत्रा स्वत:चे कलागुण, अस्तित्व आणि क्षमता सिद्ध करण्याची एक नामी संधी असते. महापालिकेने बचत गटातील महिलांची हीच भावना आणि गरज ओळखून पवनाथडी जत्रा सुरू केली. यामध्ये लोकप्रतिनिधींचे सहकार्य आणि नागरिकांचा उत्फुर्त प्रतिसाद महत्वाचा दुवा ठरला. आज पवनाथडी जत्रा पिंपरी चिंचवड शहराची एक परंपरा बनली आहे आणि ही परंपरा अशीच वर्षानुवर्षे चालू राहील, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी व्यक्त केला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी सांगवी येथील पी. डब्ल्यू. डी मैदान येथे ११ ते १५ जानेवारी २०२४ या कालावधीत पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या जत्रेचे उद्घाटन खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार अश्विनी जगताप आणि अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांच्या हस्ते तसेच महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत संपन्न आले, त्यावेळी अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील बोलत होते.

या उद्घाटन समारंभास माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, माजी नगरसदस्य शंकर जगताप, विलास मडीगेरी, राजू दुर्गे, सागर अंगोळकर, माजी नगरसदस्या उषा मुंढे, शारदा सोनवणे, मनिषा पवार, उप आयुक्त मनोज लोणकर, अजय चारठाणकर, क्षेत्रीय अधिकारी उमेश ढाकणे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल यांसह महापालिका कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील म्हणाले, महापालिकेने नेहमीच महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. त्यातील नवी दिशा या उपक्रमाला जागतिक पातळीवर नामांकन मिळाले आहे. आज महापालिकेच्या अनेक उपक्रमांमध्ये महिलांचा समावेश असण्यामागे त्यांची शिस्तबद्धता आहे. पवनाथडी जत्रेच्या माध्यमातून महिलांना तात्पुरत्या स्वरूपात आर्थिक पाठबळ मिळत असले तरी महिलांना कायमस्वरूपी आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. महापालिका महिला बचत गटांना आणखी सक्षम करण्यासाठी महिला बचत गट मॉल ही संकल्पना राबविण्याचा विचार सुरू आहे. यासाठी त्यांना एकाच ठिकाणी गाळे उपलब्ध करून देण्यात येणार असून या संकल्पनेमुळे बचत गटांना कायमस्वरूपी एक व्यासपीठ निर्माण होणार आहे.

आमदार अश्विनी जगताप म्हणाल्या, स्थानिक नागरिकांसाठी एक गावजत्रा असावी अशी शहरातील बऱ्याच महिलांची इच्छा होती. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने महिलांची हीच गरज ओळखून पवनाथडी जत्रा स्त्रियांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, रोजगार आणि व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केली. आज ही पवनाथडी जत्रा शहराची मानबिंदू ठरली आहे. पवनाथडी जत्रेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची तसेच देशी बनावटीच्या आकर्षक आणि टिकाऊ वस्तू विकत घेण्याची संधी मिळत आहे. नवीन वर्षास सुरुवात होताच पवनाथडी जत्रा कधी जाहीर होते आणि आपण भाग घेतोय असे वेध बचत गटांना लागतात. यावर्षीही जत्रा जाहीर झाली आणि महापालिकेने उत्तम नियोजनासह महिलांना जास्तीत जास्त सुविधा पुरविण्यावर भर दिला असल्याचे दिसत असून स्थानिकांना जास्तीत जास्त संधी देण्यावर भर दिला आहे. बचत गटांच्या माध्यमातून घरखर्च काढण्याचा मानस या पवनाथडी जत्रेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेचा असतो आणि या महिलांना रोजगार, उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजनांच्या आधारे वेळोवेळी सहकार्य करण्याचे काम शहरातील लोकप्रतिनिधींनी आणि महापालिकेने केले आहे.

या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेल्या चित्रा वाघ यांनी आपले मत मांडताना सांगितले, चूल आणि मूल सोडून महिला काहीतरी करू शकते याचे उत्तम उदाहरण या जत्रेच्या माध्यमातून महिला बचत गटांनी सर्वांसमोर ठेवले आहे. या बचत गटातील महिलांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. समाजाचे हित जोपासण्याचे आणि महिलांना विविध योजनांच्या माध्यमातून बळ देण्याचे काम महापालिका करत आहे. पवनाथडी जत्रेत येण्याचा दरवर्षी एक वेगळाच आनंद असतो. २००७ पासून पवनाथडी जत्रेला सुरूवात झाली आणि आजही तितक्याच उत्साहात या जत्रेची परंपरा पुढे चालू ठेवण्याचे काम महापालिकेने केले आहे. दरवर्षी या पवनाथडी जत्रेचे स्वरूप अधिकाधिक मोठे होत चालले आहे. पवनाथडी जत्रेसारख्या विविध उपक्रमांद्वारे महिला बचत गटांची ही उत्पादने जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जागतिक पातळीवर या उत्पादनांना प्रसिद्धी मिळाली तर येणारा प्रत्येक दिवस हा भारतातल्या महिलेचा असेल.

उप आयुक्त अजय चारठाणकर म्हणाले, पवनाथडी जत्रेला २००७ मध्ये सुरुवात झाली आणि आज १६ वर्षे पूर्ण झाली. तेव्हापासून आजपर्यंत महापालिकेच्या वतीने पवनाथडी जत्रेमध्ये महिलांच्या सक्षमीकरणाच्या अनुषंगाने विविध प्रयोग करण्यात आले. यावर्षी दिव्यांग बचत गट आणि तृतीयपंथी बचत गटांची स्थापना करून नव्याने त्यांना स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. स्थानिक कलाकारांना आणि महिलांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्यावर यावेळी भर देण्यात आला आहे. सध्या पिंपरी चिंचवड शहरात १३ हजारपेक्षा जास्त सक्रीय बचत गट आहेत. त्यातील अनेक महिलांनी पवनाथडी जत्रेतील स्टॉल्सची संख्या वाढवण्याची मागणी केली होती. त्यामुळे महिलांची गरज ओळखून महापालिकेच्या वतीने यावर्षी ८२२ स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यातील ३४२ स्टॉल्स हे साहित्य विक्रीसाठी, २२० स्टॉल्स शाकाहारी मराठमोळ्या खाद्यपदार्थांसाठी, २५० स्टॉल्स हे मांसाहारी खाद्यपदार्थांसाठी आणि बाकीचे १० स्टॉल्स हे महानगरपालिकेतर्फे नागरिकांना विविध सुविधा पुरविण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. दररोज १ लाखांपेक्षा जास्त नागरिक पवनाथडी जत्रेस भेट देतात आणि साहित्य खरेदी करतात, खांद्यपदार्थांचा अस्वाद घेतात. पवनाथडी जत्रेच्या माध्यमातून नागरिकांच्या मिळणाऱ्या याच अतुलनीय प्रतिसादामुळे महिला बचत गटांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास मदत होत आहे.

या उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक उप आयुक्त अजय चारठाणकर यांनी तर सुत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. यानंतर मराठमोळी संस्कृती जतन करणारा महाराष्ट्राची लोकधारा हा लोकप्रिय कार्यक्रम पार पडला