…तर कोणीही आमदार अपात्र नाही

0
237

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल आज संध्याकाळी सुनावला जाईल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अपात्र प्रकरणात निर्णय देतील. निकालाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या निकालाकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे. या प्रकरणावर भाष्य करताना सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदेंनी चार शक्यता बोलून दाखवल्या.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या राजकीय कारकिर्दीच्या दृष्टीनं आजचा निकाल महत्त्वाचा असेल. निकाल नेमका कोणाच्या बाजूनं लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असताना वकील सिद्धार्थ शिंदेंनी चार शक्यता वर्तवल्या. ‘या प्रकरणातील पहिली शक्यता म्हणजे शिंदे आणि त्यांचे आमदार अपात्र ठरतील. दुसरी शक्यता म्हणजे ठाकरे गटातील आमदार अपात्र ठरतील,’ असं शिंदे म्हणाले.

या प्रकरणातील तिसरी शक्यता म्हणजे कोणीही अपात्र ठरणार नाही. दोन्ही गटातील कोणाचीही आमदारकी जाणार नाही. शिवसेनेनं २०१८ मध्ये आपल्या पक्षाच्या घटनेत दुरुस्ती केली. पण ही घटनादुरुस्ती आपल्यापर्यंत पोहोचलीच नाही, असं निवडणूक आयोगानं म्हटलं होतं. निवडणूक आयोगाचाच धागा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर पकडतील. शिवसेना पक्षाची घटना कशी आहे ते मला माहीत नाही, असं नार्वेकर म्हणू शकतात. अशा परिस्थितीत सगळ्यांची आमदारकी वाचेल, असा अंदाज सिद्धार्थ शिंदेंनी व्यक्त केला.

दोन्ही बाजूकडचे काही आमदार अपात्र ठरतील, अशी चौथा शक्यता शिंदेंनी बोलून दाखवली. एकनाथ शिंदे अपात्र ठरले नाहीत, तर हे त्यांचं पद आणि सरकार वाचेल. पण तपासणी, उलट तपासणीत नार्वेकरांना काही तफावत जाणवल्यास तर त्या धर्तीवर ते काही आमदारांना अपात्र ठरवू शकतात, असा अंदाज त्यांनी वर्तवला.