पिंपरीतून मुंबईकडे लाखों मराठा बांधव कूच करणार: सतीश काळे

0
125

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत गंभीर नसलेल्या राज्य सरकारला जाग आणण्यासाठी 20 जानेवारीला मराठा बांधव मुंबईत धडकणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरामधून देखील लाखो मराठा बांधव कूच करणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सतीश काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. मराठा आरक्षणाचा लढा आणखीन तीव्र करण्याचा निर्धार समाज बांधवांचा असल्याची माहिती काळे यांनी दिली.

या आंदोलनात सहभागी होण्यासाठी शहरातील विविध भागात फिरून गणपती मंडळ, शहरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींना भेटून जनजागृती केली जात आहे.या मध्ये प्रकाश जाधव,वैभव जाधव,मिरा कदम,रावसाहेब गंगाधरे,संतोष शिंदे,संदिपराजे मुटकुळे,लहू लांडगे,गणेश कुंजीर,ज्योती जाधव,अशोक सातपुते,नकुल भोईर,सुरज ठाकर,कल्पना गिड्डे, सुनिता शिंदे,वसंत पाटील आदीसह विविध संघटनेचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

सतीश काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य आणि केंद्र सरकार कोणताही ठोस, सकारात्मक निर्णय घेताना दिसत नाही.मराठा समाजाला दिलासा दिला जात नाही. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी सातत्याने आंदोलनाचे हत्यार उपसावे लागत आहे. तरी देखील सरकारचे डोळे उघडत नाही. या उलट आंदोलनाला बदनाम करण्याची खेळी केली जात आहे. प्रत्येक वेळी वेगवेगळे आश्वासन देऊन मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घ्यायला लावले. मात्र दिलेल्या आश्वासनाला ते जागले नाहीत. त्याच्या निषेधार्थ आणि मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मुंबईत जरांगे यांनी आमरण उपोषण छेडले आहे. त्याला शहरातून लाखो बांधव घेऊन जाऊन पाठिंबा देणार असल्याचे काळे यांनी सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांचे नेतृत्वाखाली मुंबईत आमरण उपोषण करण्याचे ठरले आहे. त्याला पिंपरी चिंचवड शहरातून देखील आम्ही पाठिंबा देणार आहोत. शहरात जनजागृती करून मराठा बांधवांसह इतर सामाजिक संघटनांच्या लोकप्रतिनिधी सोबत चर्चा करण्यात आली आहे.शहरातून एक लाखांपेक्षा अधिक मराठा बांधव मुंबईत घेऊन जाण्याचा आमचा निर्धार आहे.