ज्येष्ठ पत्रकार विवेक इनामदार यांना उत्कृष्ट पत्रकारिता” पुरस्कार

0
213

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – अखिल मराठी पत्रकार संस्था (रजि.) संलग्न पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचा या वर्षीचा मानाचा “उत्कृष्ट पत्रकारिता” पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार विवेक इनामदार यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापुसाहेब गोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शुक्रवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष दादाराव आढाव, डिजिटल मीडिया अध्यक्ष भीमराव तुरूकमारे, वरिष्ठ उपाध्यक्ष संतलाल यादव, कोषाध्यक्ष सुनील उर्फ बाबू कांबळे आदी उपस्थित होते.

बापूसाहेब गोरे यांनी सांगितले की, विवेक इनामदार यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात केलेले भरीव योगदान उल्लेखनीय आहे. त्यांनी केलेल्या या कार्याचा गौरव म्हणून “उत्कृष्ट पत्रकारिता” पुरस्कार आणि रोख रुपये ५१ हजार रुपये, शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच ‘संसद महारत्न’ पुरस्कार प्राप्त मावळचे खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. त्याच बरोबर नितीन यादव (प्रशासन भूषण पुरस्कार), वाल्मिक कुटे (समाज सेवा पुरस्कार), एम. ए. हुसेन (रुग्ण सेवा पुरस्कार) आणि माधव पाटील (पर्यावरण प्रेमी पुरस्कार) यांचाही गौरव करण्यात येणार आहे.

पत्रकार दिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार सोहळा मंगळवारी (दि. ९ जानेवारी) दुपारी १२ वाजता काळेवाडी, वाकड कस्पटे वस्ती, हॉटेल ॲम्बीयन्स (काळेवाडी फाटा जवळ) येथे आयोजित केलेल्या या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष पद पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील भूषविणार आहेत.

ज्येष्ठ पत्रकार व राजकीय समीक्षक अरुण खोरे, आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, अण्णा बनसोडे, उमा खापरे, माजी महापौर उषा ढोरे, भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष अजित गव्हाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामठे, काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) शहराध्यक्ष ॲड. सचिन भोसले, शिवसेना (एकनाथ शिंदे गट ) जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वाल्हेकर, मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, आपचे शहराध्यक्ष चेतन बेंद्रे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.