नवी दिल्ली, दि. ८ (पीसीबी) – सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारने दिलेला निर्णय रद्द केला आहे. बिल्किस बानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारचा निर्णय फिरवत दोषींची शिक्षा रद्द केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता दोषींना पुन्हा तुरुंगात जावं लागणार आहे.
सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटलंय की, जिथे गुन्हेगारावर खटला चालवला गेला आहे आणि शिक्षा झाली आहे, फक्त राज्यच दोषींना माफी देण्याचा निर्णय घेऊ शकतं. सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की, गुजरात सरकार दोषींची शिक्षा माफ करण्याचा निर्णय घेऊ शकत नाहीतर महाराष्ट्र सरकार यावर निर्णय घेईल. बिल्किस बानो प्रकरणाची महाराष्ट्रात सुनावणी झाली हे विशेष.
दोषींना सोडण्याचा गुजरात सरकारचा निर्णय म्हणजे सत्तेचा दुरुपयोग असल्याचंही न्यायालयाने म्हटलं आहे. गुजरात सरकारने बिल्किस बानो सामूहिक बलात्कारातील 11 आरोपींची शिक्षा माफ केली होती.
गुजरात सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं, त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. न्यायमूर्ती बीव्ही नागरथना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली आणि 12 ऑक्टोबर 2023 रोजी निकाल राखून ठेवला.