पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – १५०० कोटींच्या टीडीआर घोटाळ्यातून महायुती सरकार आणि भाजपाची प्रतिमा डागाळणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी भाजपचे माजी शहर प्रवक्ते अमोल थोरात यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्याबाबत दिलेल्या निवेदनात थोरात म्हणतात,
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा १५०० कोटींचा टीडीआर घोटाळा समोर आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत वाकड येथे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाला लागून सर्व्हे क्रमांक १२२ मध्ये क्रमांक ४/३८ या जागेत पीएमपीएमएल डेपो व ट्रक टर्मिनल पार्किंगसाठी आरक्षण आहे. या आरक्षित जागेचे एकूण क्षेत्रफळ १० हजार २७४ चौरस मीटर आहे. ही जागा टीडीआरचा मोबदला देऊन विलास जावडेकर इन्फिनिटी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडतर्फे संचालक सर्वेश विलास जावडेकर व आदित्य विलास जावडेकर यांच्याकडून महापालिकेच्या ताब्यात घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यानंतर त्याच विलास जावडेकर इन्फिनिटी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बिल्डरला ही आरक्षणाची जागा भूखंड एकत्रिकृत विकास नियंत्रण नियमावलीनुसार विकासित करण्यास देण्याचा प्रशासकीय प्रवास सुरू झाला. हा प्रशासकीय प्रवास १५०० कोटींचा जादाचा टीडीआर देण्यापर्यंत पोहोचला. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी संबंधित बिल्डरला बांधकाम परवानगी, टीडीआरची मंजुरी, सुधारित बांधकाम परवानगीचे सोपस्कार पूर्ण करून सर्व मंजुरी तातडीने दिली.
टीडीआरचा दर कायद्याने ठरलेला आहे. वाकड येथील जागेचा रेडी रेकनरनुसार दर प्रति चौरस मीटर २६ हजार ६२० रुपये आहे. मात्र पिंपरी-चिंचवड महापालिकेने तब्बल ६५ हजार ०६९ रुपये प्रति चौरस मीटर दराने संबंधित बिल्डरला टीडीआर दिला. या जादा दराने दिलेल्या टीडीआरमुळे बिल्डरचा तब्बल १५०० कोटीहून अधिकचा फायदा झाला. महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांनी संगनमताने एका बिल्डरला फायदा पोहोचवण्याच्या उद्देशाने तब्बल १५०० कोटींचा जादा टीडीआर दिला.
राज्यातील महायुतीचे सरकार सर्वोत्तम काम करीत आहे. सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासह भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा प्रयत्न महायुती सरकारकडून होत आहे. मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि मा. अमित शहा यांच्या नेतृत्त्वात भारतीय जनता पार्टी देशात सकारात्मक वातावरण निर्मिती करीत आहे. त्यामुळे पक्षाची आणि सरकारची प्रतिमा उजळत आहे. असे असताना पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केलेल्या टीडीआर घोटाळ्यामुळे महायुती सरकार तसेच भाजपाची प्रतिमा डागाळण्याचे काम केले आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यावर सरकारकडून कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे. याप्रकरणी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना सक्तीच्या रजेवर पाठवून सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच इतर दोषींवर देखील कारवाई करावी, ही विनंती.