“दु:खमुक्त मानवता हा साहित्याचा खरा हेतू!” – प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस

0
132

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) “दु:खमुक्त मानवता हा साहित्याचा खरा हेतू असतो!” असे विचार ज्येष्ठ समीक्षक आणि ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान सभागृह, शिवतेजनगर, चिंचवड येथे व्यक्त केले. कवयित्री कांचन नेवे लिखित ‘स्वानंदाच्या झुल्यात’ आणि ‘गंध प्राजक्त’ या दोन कवितासंग्रहांचे प्रकाशन करताना प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे, ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव, ज्येष्ठ कवी बाबू डिसोजा, ललिता सबनीस, रजनी अहेरराव, श्रीकृष्ण नेवे आणि कवयित्री कांचन नेवे यांची व्यासपीठावर तसेच साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.

प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, “कल्पनाविलासाचा सौंदर्य आविष्कार हे कवितेचे खरे सामर्थ्य असते. सुंदर प्रतिमांनी नटलेल्या कांचन नेवे यांच्या कवितांमध्ये पौराणिक संदर्भांसह आधुनिकताही आहे. शेवटच्या श्वासापर्यंत कविता आपल्याला साथ देईल, ही कवयित्रीची कवितेवरील निष्ठा प्रशंसनीय आहे. निसर्ग आणि जीवन यामधील समतोल साधताना त्यांनी निसर्गाच्या रौद्र रूपाचा धांडोळा घ्यावा!” राजन लाखे यांनी, “आनंदी जीवन आणि निसर्गचित्रण असे दोन आयाम कवयित्रीने आपल्या दोन्ही संग्रहांमधून समर्थपणे मांडले आहेत!” असे मत व्यक्त केले. राज अहेरराव यांनी, “संपूर्ण कुटुंब साहित्यात किती रममाण झाले आहे, याचा एकमेव वस्तुपाठ म्हणजे कांचन नेवे यांचे कुटुंब होय. कवयित्रीने बोलीभाषेतील शब्दांचा केलेला वापर रसिकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील!” असे गौरवोद्गार काढले.

कांचन नेवे यांनी आपल्या मनोगतातून, “एकत्रित कुटुंब आणि कविता यामुळे प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करण्याचे बळ प्राप्त झाले. आईच्या ओव्यांमधून काव्याची गोडी लागली. कुटुंबीय आणि विशेषतः बंधू रमेश रघुनाथ नेवे – वाणी यांचा पाठिंबा अन् प्रोत्साहनामुळे कवितालेखन घडत गेले!” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. रजनी अहेरराव, ललिता सबनीस, माधुरी डिसोजा यांनी कांचन नेवे यांच्या कवितांचे अभिवाचन केले. बाबू डिसोजा यांनी नेवे परिवाराशी असलेल्या स्नेहबंधाला उजाळा दिला; तर अजय नेवे यांनी हृद्य शब्दांत आईच्या वात्सल्याच्या आठवणी जागवल्या.

दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन आणि योगिता कोठेकर यांनी गायलेल्या स्वागतगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक – अध्यक्ष नारायण बहिरवाडे, स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रा. हरिनारायण शेळके आणि नेवे परिवार यांनी संयोजन केले. सीमा गांधी यांनी सूत्रसंचालन केले. विजय नेवे यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.