मेफेड्रॉन ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

0
352

हिंजवडी, दि. ७ (पीसीबी) – हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेफेड्रॉन ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. पोलिसांनी 65 ग्रॅम मेफेड्रॉन ड्रग्जसह 7 लाख 52 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 6) रात्री बारा वाजता भुजबळ चौक, वाकड येथे करण्यात आली.

इम्रान चांद शेख (वय 32, रा. कोंढवा, पुणे), समीर शहाजहान शेख (वय 40) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार अजित कुटे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुजबळ चौक, वाकड येथे दोघेजण मेफेड्रॉन ड्रग्ज विक्रीसाठी आले असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी भुजबळ चौकात सापळा लावला. संशयित दोघेजण दिसताच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 65 ग्रॅम मेफेड्रॉन ड्रग्ज आढळून आले. ड्रग्जसह, एक दुचाकी, रोख रक्कम आणि तीन मोबाईल फोन असा एकूण सात लाख 52 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

नायजेरियन व्यक्तीचा सहभाग

या मेफेड्रॉन ड्रग्ज विक्री प्रकरणात एका नायजेरियन व्यक्तीचा देखील सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी इम्रान आणि समीर या दोघांकडे आढळलेले मेफेड्रॉन ड्रग्ज त्यांनी त्यांचा नालासोपारा, मुंबई येथील साथीदार टोनी याच्याकडून आणला असल्याचे तपासात समोर आले. टोनी हा नायजेरियन व्यक्ती आहे. त्याचा देखील या गुन्ह्यात सहभाग आढळल्याने त्याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत