किसान आंदोलनांच्या धर्तीवर लढा द्या : बाबा कांबळे

0
178
  • हिट अँड रन विरोधात पंजाब मधील भवाणीगड पटियाला येथे चालकांचा रास्ता रोको
  • ऑटो, रिक्षा, टॅक्सी, ट्रक, टेम्पो बस फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे देखील सहभागी

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) शेतकरी हिताच्या विरोधात निर्णय घेतल्यानंतर देशभरातील शेतकरी संतप्त होऊन रस्त्यावर उतरले होते. त्यांनी केंद्र सरकारविरोधात चिकाटीने लढा दिला. लाठ्या खाल्ल्या. त्यांच्या लढ्यापुढे सरकारला माघार घ्यावी लागली. शेतकऱ्यांची हीच चिकाटी पाहून त्यांच्याप्रमाणे हिट अँड रन विरोधात लढा द्यायला हवा. केंद्राने रचलेला हिट अँड रनचा जुलमी कायदा माघार घ्यायला भाग पाडू, असे प्रतिपादन ऑटो, रिक्षा, टॅक्सी, ट्रक, टेम्पो बस फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले.

केंद्र सरकारने हिट अँड रन प्रकरणी 3 जानेवारी पासून दिल्ली जंतर मंतर येथे बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनासाठी देशभरातील ऑटो, बस, ट्रक, टेम्पो ड्रायव्हर संघटनेचे प्रतिनिधी दिल्ली येथे दाखल झाले. आंदोलनाची ही लाट पंजाब मध्ये देखील पोचली. पंजाब मधील भवाणीगड पटियाला येथील ट्रक, टेम्पो चालकांनी दिवसभर रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी आंदोलनात सहभागी होत बाबा कांबळे यांनी मार्गदर्शन केले.

केंद्र सरकारच्या विरोधात विविध मागण्यासाठी ऑटो, रिक्षा, टॅक्सी, ट्रक, टेम्पो बस चालक मालक आंदोलन करत आहेत. अपघात झाल्यास चालकाला दहा वर्षांची शिक्षा आणि 7 लाख रुपये दंड असा असलेला काळा कायदा सरकारने तात्काळ मागे घ्यावा. देशातील सर्व चालक आणि मालकांसाठी राष्ट्रीय कल्याण मंडळाची स्थापना करावी. त्याद्वारे सामाजिक सुरक्षा, आरोग्य सुविधा, मुलांना शिक्षणाच्या सुविधा आणि वृद्धापकाळात पेन्शन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. राष्ट्रीय चालक आयोग स्थापन करावा. सरकारने देशभरात चालक दिन साजरा करावा. दिल्लीत चालकांसाठी राष्ट्रीय स्मारक बांधावे आदी मागण्यांसाठी बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत आंदोलन झाले. महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड, पुणे आणि महाराष्ट्रातून ऑटो व ट्रक टेम्पो चालकांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. संबधित आरटीओ कार्यालयावर आंदोलन करून पाठिंबा देण्यात आला आहे.पंजाब मध्ये देखील रास्ता रोको करण्यात आले. या आंदोलनात बाबा कांबळे सहभागी झाले होते. या वेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केले.

बाबा कांबळे म्हणाले की, हिट अँड रन प्रकरणी देशभरातील २५ कोटी चालक आंदोलन करत आहेत. काही जण आंदोलन बंद झाल्याची चुकीची माहिती देत आहेत. मात्र हे आंदोलन मागे हटलेले नाही. देशभरात आंदोलन सुरूच आहे. केंद्र सरकार देशभरातील 25 कोटी वाहनचालकांवर अन्याय करत असून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र देशभरातील चालकांच्या जोरावर होणाऱ्या अन्यायावर मात करून लढा जिंकू असा निर्धार बाबा कांबळे यांनी व्यक्त केला.