मुंबई, दि. ५ (पीसीबी) : नवी मुंबईतील घणसोली येथे एअरटेलचच्या कर्मचाऱ्यांना आयएएस अधिकाऱ्याने जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. आयएएस अमन मित्तल मंत्रालयात उपसचिव पदावर कार्यरत आहेत. दरम्यान दोघांनीही एकमेकांविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून वायफायच्या कनेक्शनवरून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मारहाण कऱणाऱ्या मित्तल बंधूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन मित्तल हे आपला भाऊ देवेश मित्तल यांच्या घरी आले होते. यावेळी त्यांनी एअरटेलचे वायफाय कनेक्शन लावले. मात्र ते सुरू झाले नाही. त्यांनी संबंधीत कंपनीकडे याची तक्रार केली. तक्रारीनंतर पुन्हा दोन कर्मचारी वायफायचे कनेक्शन तपासण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर हाणामारी झाल्याचा प्रकार घडलाय. एअरटेल कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली असून हात, पाय आणि पाठीवर मारहाणीचे वळ उठले आहेत.
याप्रकरणी एअरटेल कर्मचाऱ्यांनी आयएएस अधिकारी अमन मित्तल आणि त्यांचे बंधू देवेश मित्तल यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तर आयएएस अमन मित्तल यांनी देखील एअरटेलचे कर्मचारी सागर मांढरे आणि भूषण गुजर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. रबाळे पोलिसांनी दोन्हीही तक्रारींची दखल घेत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
खरे तर या संदर्भात मारहाण झालेला सागर मांढरे यांने सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट वाचून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. पीसीबी वाचकांसाठी ती पोस्ट आहे तशी देत आहोत…
नमस्कार, मी सागर मांढरे नवी मुंबई कोपरखैरणे मध्ये राहतो. सध्या मी Airtel मध्ये इंजिनिअर आहे दि. ३०/१२/२०२३ रोजी मी ‘Wifi Router Installation’ साठी घणसोली मध्ये व्यंकटेशश्वर building मध्ये गेलो होतो. त्याच ठिकाणी एका Customer ची इंटरनेट बद्दल मला Complaint आली ती पाहण्यासाठी गेलो होतो. तो Customer IAS अधिकारी होता. त्याचा सोबत त्याचा घरामध्ये त्याचा भाऊ देखील होता, मी तपासणी केली असता इंटरनेट सुरळीत चालू असल्याची खात्री झाली परंतु IAS अधिकारी याला बेडरूम मध्ये रेंज मिळत नसल्याचे त्याने मला सांगितले मी त्याची देखील पाहणी केली, त्याला बेडरूम मध्ये त्याला रेंज नव्हती मिळत त्यावर मी त्याला सांगितले “तुमचे 4BHK घर आहे आणि hall मध्ये Router लावल्याने त्याची रेंज बेडरूम पर्यंत मिळण शक्य नाही.”
त्यावर तो भडकला आणि “मी एवढे पैसे भरले आहेत मला बेडरूम मध्ये रेंज आलीच पाहिजे” असं तो बोलू लागला त्यावर मी त्याला wifi solution बद्दल सांगितले; परंतु त्यावर तो अजून भडकला आणि मला शिवीगाळ देण्यास सुरुवात केली. मी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला परंतु तो काही ऐकलं नाही आणि माझा अंगावर धावून येऊ लागला. मी त्याला अडवण्यासाठी माझे हात पुढे केले, त्यावर त्या IAS अधिकारी (अमन मित्तल) आणि त्याचा भाऊ (देवेश, मित्तल) यांनी घरात दरवाजा बंद करून मला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि खाली तैनात असणाऱ्या शिपाई कामगारांना त्याने कॉल करून बोलावून घेतले.
ते ०४ जन लोखंडी पाईप, PVC पाईप आणि लाकडी दंडुके घेऊन वर आले काहीही विचार न करता त्या ०४ जणांनी देखील मला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या नंतर त्यानेच पोलिसांना फोन करून बोलावून घेतले. मला पोलीस तेथून घेऊन जात असताना त्यातील एकाने पुन्हा दोन वेळा माझा कानशिलात लगावली आणि रबाळे पोलीस स्टेशनला घेऊन त्या अमन मित्तल च्याच गाडीतून घेऊन गेले. माझा अंगावरील घाव बघितल्यावर पोलीस मला घेऊन ऐरोली येथे NMMC हॉस्पिटल मध्ये गेले. नंतर पोलीस स्टेशन ल आल्यावर प्रथम माझ्यावर FIR दाखल केली. माझी तक्रार पोलीस घेत नव्हते माझे अनेक सहकारी आणि मित्र रबाळे पोलीस चौकी बाहेर उभे होते अनेक जणांना संपर्क केल्यावर सकाळी ०३:०० वाजता त्यांनी माझी तक्रार नोंदवली. पोलिसावर सुध्दा त्याने वरून दबाव आणल्याचे मला जाणवले आज या घटनेला आठवडा झाला तरी देखील गुन्हेगारांवर अजून कोणतीही कारवाई झाली नाही.