कौशल्यम हे शहरातील तरुणांना सक्षम बनविण्यासाठी

0
247

पिंपरी, दि. ५ (पीसीबी)- “कौशल्यम हे शहरातील तरुणांना सक्षम बनविण्यासाठी आणि शाश्वत आर्थिक विकासाला चालना देण्याच्या वाटचालीतील एक महत्वाचे पाऊल आहे. आपल्या शहराच्या उज्वल भविष्यासाठी लागणा-या सामूहिक कृतीचे महत्त्व अधोरेखित करणारा हा एक पथदर्शी उपक्रम असल्याचे मत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांनी निगडी येथील लाईटहाऊसच्या आवारात आयोजित केलेल्या एका विशेष कार्यक्रमात “कौशल्यम् युथ अँड बिझनेस ग्रोइंग टुगेदर अर्थात युवक आणि उद्योग यांचा एकत्रित विकास या महत्वपूर्ण उपक्रमाची घोषणा केली त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निठकंठ पोमण, उप आयुक्त अजय चारठाणकर, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष दिपक करंदीकर, संदीप मोदी, विविध कंपन्यांचे व्यवस्थापक लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. गणेश नटराजन, ग्लोबल डेव्हलपमेंट इनक्यूबेटरच्या अन्नू मेहता, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही शहरातील तरुणांना योग्य नोकऱ्या मिळवून देण्यासाठी मागणी आधारित असा, जास्तीत जास्त उपजीविकेची साधने मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्याचा महत्वपूर्ण प्रकल्प राबवित आहे. तरुणांना खात्रीशीर माहिती, करिअर समुपदेशन, व्यावसायिक कौशल्ये पुरवली जाऊन, नोकरी मिळवण्यासाठी आणि नंतरचेही सहकार्य याद्वारे त्यांना उपजीविका करता येईल. यासाठी व्यावसायिक कौशल्य अभ्यासक्रमांची रचना करुन त्यामध्ये उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचाही समावेश केला जाईल, जेणेकरुन तरुणांची रोजगारक्षमता वाढेल असे सांगून कौशल्यम हा एक सहयोगी प्रकल्प आहे जो तरुणांच्या आकांक्षा आणि उद्योगाची मागणी यांच्यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न करेल असेही ते यावेळी म्हणाले.

लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. गणेश नटराजन यांनी सर्व संबंधितांनी यात सक्रिय सहभाग घ्यावा यावर भर दिला. पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, औरंगाबाद, भुवनेश्वर, कटक आणि हैदराबाद येथील दीड लाख युवकांसोबत यशस्वीपणे प्रकल्प राबवल्यानंतर, आम्हाला या ऐतिहासिक कार्यात भागीदार म्हणून सामील होताना आनंद होत आहे. कौशल्यम साठी सामूहिक जबाबदारी आवश्यक आहे आणि आम्ही या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी आणि तो वाढविण्यासाठी सरकार, देणगीदार, भरती आणि अभ्यासक्रम सामग्रीसाठीचे कॉर्पोरेट भागीदार, तसेच स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचे समर्थन लाभेल अशी अपेक्षा करतो असे सांगून त्यांनी २०२७ पर्यंत, कौशल्यम त्याच्या विविध कार्यक्रमांद्वारे कमी-उत्पन्न असलेल्या आणि उपेक्षित समुदायातील अंदाजे ३५ हजार तरुणांच्या जीवनावर आणि उपजीविकेवर प्रभाव पाडेल असे मत व्यक्त केले.

कौशल्यम प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये:-

सर्वसमावेशक प्रवेश: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि लाईटहाउस कम्युनिटीज फौन्डेशन हे संपूर्ण पिंपरी-चिंचवडमध्ये कौशल्य आणि उपजीविकेसाठी ८ ‘लाईटहाऊस’ आणि ७ ‘लाईटहाऊस कनेक्ट’ केंद्रे चालवणार आहेत. ४ लाईटहाऊस केंद्रे पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि निगडी येथे सध्या आधीच कार्यरत आहेत, तर बोपखेल आणि बोऱ्हाडेवाडी येथे दोन लाईटहाऊस कनेक्ट केंद्रे या महिन्यात सुरू होणार आहेत आणि उर्वरित ९ केंद्रे या आणि पुढील वर्षी सुरू होतील. प्रत्येक लाईटहाऊस केंद्रामध्ये प्रशस्त आणि भरपूर प्रकाश असणाऱ्या वर्गखोल्या आणि आवश्यक तांत्रिक सेटअप असेल. ही केंद्रे उपेक्षित समुदायांच्या जवळच्या परिसरात असतील, त्यामुळे त्यांना इथे सहजपणे येता येईल. याशिवाय, कौशल्य आणि नोकरीच्या संधींबद्दल माहिती घेण्यासाठी शहरातील कोणत्याही तरुणाला कॉल करण्यासाठी एक हेल्पलाइन असेल. ‘कौशल्यम’ या वैशिष्ट्यपूर्ण तांत्रिक पोर्टलच्या माध्यमातून तरुणांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणी शेकडो कौशल्य आणि नोकरीच्या संधीं स्वतःच निवडता येतील.

उपक्रमाचे स्वरूप:- उपक्रमांची रचना ही ‘मागणी-आधारित उपजीविका’ हे मॉडेल विचारात घेऊन केली आहे आणि त्यातून उद्योग आणि तरुणाई या दोघांच्या गरजा पूर्ण केल्या जातील. उपक्रमात प्रवेश करणा-या प्रत्येक तरुणाला रिदम हा लाईटहाऊचा अग्रगण्य फाउंडेशन कोर्स करता येईल,ज्यायोगे तरुणांना स्वतःला, त्यांच्या आकांक्षा आणि कामाचे जग शोधण्यास सक्षम होता येईल. याव्यतिरिक्त, रोजगारक्षमता वाढविण्यासाठी स्पोकन इंग्लिश आणि कामासाठी आवश्यक डिजिटल कौशल्ये हे अभ्यासक्रम सेक्टरविषयक प्राथमिक अभ्यासक्रम म्हणून दिले जातील. ज्यांच्याकडे आधीच संबंधित कौशल्ये आहेत आणि ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी ‘जॉब-फर्स्ट’ हा कार्यक्रम राबविला जाईल. ज्या क्षेत्रांमध्ये आत्ता मागणी आहे अशा उद्योगांमध्ये काम करण्यासाठी आवश्यक विशिष्ट कौशल्ये शिकवणारे विशेष व्यावसायिक कौशल्य अभ्यासक्रम तरुणांना दिले जातील.

तंत्रज्ञानावर आधारित, अनुभवात्मक करिअर समुपदेशन: – कौशल्यम हा उपक्रम व्हर्च्युअल/ऑगमेंटेड आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तरुणांना नोकरीतील कामाचे स्वरूप आणि करिअरचा विकास यांचा साक्षात अनुभव देईल. तंत्रज्ञानावर आधारित समुपदेशन हे तरुणांना त्यांच्या समुदायामध्ये तसेच लाईटहाऊस केंद्रांमध्ये त्यांच्या अभ्यासक्रमां दरम्यान दिले जाईल.

गुंतवणूक:- कौशल्यम प्रकल्प हे विविध भागधारकांनी एकत्र येऊन शाश्वत बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या कृतीचे जिवंत उदाहरण आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही या केंद्रांसाठी आवश्यक जागा/ठिकाणे, त्यांचे नूतनीकरण आणि पायाभूत सुविधा पुरवणार आहे. कौशल्यमसाठीचे देणगीदार अँकर पार्टनर मायकेल आणि सुसान डेल फाऊंडेशन आहेत, जे प्रकल्पाच्या बहुतेक ऑपरेशनल खर्चासाठी निधी पुरवतात. ऍक्सेंचर हे लाईटहाउस कनेक्ट केंद्रांसाठी सर्वंकष उपजीविका सेवा पुरवणारे मुख्य देणगीदार भागीदार आहेत.

लाईटहाऊस कनेक्ट केंद्रे ही ऍस्पेन इन्स्टिट्यूट, यूएसए च्या ग्लोबल अपॉर्च्युनिटी युथ नेटवर्क चा एक भाग म्हणून चालवली जात आहेत. इतर देणगीदारांमध्ये अॅचटलास कॉप्को इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि ई-क्लर्क्स सर्व्हिसेस लिमिटेड यांचा समावेश आहे, जे अनुक्रमे पिंपरी आणि निगडी येथील लाईटहाऊस केंद्रांना मदत करत आहेत.

परिणाम: पुढील ३ वर्षांमध्ये कौशल्यम प्रकल्प विविध कार्यक्रमांद्वारे कमी-उत्पन्न असलेल्या आणि उपेक्षित समुदायातील ३५ हजार तरुणांना प्रभावित करेल. याशिवाय, प्रत्येक झोपडपट्टीमध्ये ‘कौशल्यम कट्टा’ च्या माध्यमातून शेकडो युवा नेत्यांना पुढे आणण्यात येईल, त्यांना प्रशिक्षित केले जाईल आणि समुदायाशी कसे जोडले जावे याबाबत मार्गदर्शन केले जाईल. हजारो तरुणांसाठी रोजगार निर्मिती व्यतिरिक्त, तरुणांच्या काम करण्याच्या एकूण आकांक्षा, उपजीविकेच्या संधींबद्दल त्यांची जागरूकता आणि यशस्वी रोजगार निर्मितीमध्ये उद्योगाचा सहभाग यामध्ये लक्षणीय वाढ होईल अशी अपेक्षा आहे.

ग्लोबल डेव्हलपमेंट इनक्यूबेटरच्या अन्नू मेहता यांनी तरुणांना आर्थिक संधीं मिळाव्यात म्हणून ग्लोबल अपॉर्च्युनिटी युथ नेटवर्कचा जो स्थान-आधारित दृष्टिकोन आहे त्याबद्दल सांगितले. दीर्घकालीन आणि बहु-भागधारक यंत्रणा उभारणे असा दृष्टीकोन आहे, की ज्या यंत्रणा तरुणांसाठीचे मजूर समावेशन धोरण परिभाषित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर परा-स्थानिक माहिती वापरतात आणि ती योग्य वापरासाठी कार्यान्वित करतात. पिंपरी चिंचवडमधील या वैशिष्ट्यपूर्ण भागीदारीद्वारे, आम्ही पिंपरी-चिंचवडमधील तरुणांना स्थानिक पातळीवर, सन्माननीय, न्याय्य आणि शाश्वत रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, स्थानिक खाजगी क्षेत्र, कौशल्य पुरवठादार आणि इतर प्रमुख भागधारकांसोबत काम करण्यास उत्सुक आहोत.

पिंपरी-चिंचवडमधील उद्योगपती आणि लाईटहाउस उपक्रमातील युवा प्रतिनिधींनी या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ते वचनबद्ध आहेत. उद्योगातील नेत्यांनी त्यांच्या व्यवसायासाठी कोणती कौशल्ये आवश्यक आहेत ते शेअर करण्यासाठी आणि उद्योगास उपयुक्त अशा कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या सहनिर्मितीमध्ये योगदान देण्यासाठी दिलेल्या संधीचे स्वागत केले. युवा प्रतिनिधी हे एकत्रीकरणाच्या प्रयत्नांचे आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रमांचे नेतृत्व करून महत्त्वाची भूमिका बजावण्यास उत्सुक होते.

लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन बद्दल:-

लाईटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन हे संपूर्ण भारतातील एक दशलक्ष वंचित तरुणांसाठी जीवन-कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता यांच्या संधी निर्माण करून एक सक्षम व्यक्ती तयार करणे यासाठी प्रयत्नशील आहेत. ही संस्था २०१५ पासून एका वैशिष्ट्यपूर्ण सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून मोठ्या प्रमाणावर शहर-व्यापी परिवर्तनासाठी काम करत आहे, जिथे सरकारकडून भांडवली खर्च आणि पायाभूत सुविधा पुरवल्या जातात आणि खाजगी क्षेत्र कार्यकारी खर्च तसेच उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी योगदान देते. आत्तापर्यंत दीड लाखाहून अधिक नागरिकांना याचा लाभ झाला आहे आणि २०३० पर्यंत १० लाखाचा आकडा गाठण्याचे ध्येय ठेवले आहे असे समाज विकासाचे उप आयुक्त चारठाणकर यांनी सांगितले.