मुंबई ते कर्नाटक माल पोहोचवण्याच्या बहाण्याने साडेचार लाखांची फसवणूक

0
149

निगडी, दि.४ (पीसीबी) -मुंबई ते कर्नाटक माल पोहोचवण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीने साडेचार लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना 21 डिसेंबर ते 3 जानेवारी या कालावधीत निगडी येथे घडली.

अजयकुमार अवधेशकुमार दुबे (वय 30, रा. प्राधिकरण निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओमप्रकाश चौधरी (कंपनी पत्ता – सिफा लॉजिस्टिक, कळंबोली, नवी मुंबई) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजयकुमार आणि आरोपी ओमप्रकाश यांची तीन महिन्यांपूर्वी फोनवरून ओळख झाली होती. अजयकुमार यांनी मुंबई येथील बंदरातून त्यांचा माल कर्नाटक येथे पोहोचविण्यासाठी ओमप्रकाश याला साडेचार लाख रुपये दिले. त्यानंतर ओमप्रकाश याने अजय कुमार यांचा माल अन्य ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ट्रकमध्ये भरून दिला. संबंधित ट्रान्सपोर्ट कंपनीला अजयकुमार यांनी दिलेले साडेचार लाख रुपये ओमप्रकाश याने दिले नाहीत. तसेच त्याने फोन बंद करून बोलणे टाळत अजयकुमार यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.