रश्मी शुक्ला राज्याच्या नव्या पोलीस महासंचालक

0
229

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – रश्मी शुक्ला यांची राज्याच्या नव्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती झाली आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने रश्मी शुक्लांविरोधात नोंदवलेले दोन एफआयआर रद्द केले होते. त्यानंतर आता त्यांना थेट राज्याच्या पोलीस महासंचालकपदी बढती देण्यात आली आहे. त्या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक झाल्या आहेत.फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली. न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर आता पुन्हा त्यांना नवी संधी दिली जाणार, अशी चर्चा सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

फोन टॅपिंग प्रकरण आहे तरी काय?
माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या अधिकारी म्हणून रश्मी शुक्ला यांचं नाव घेतलं जातं. रश्मी शुक्ला यांनी राज्य गुप्तचर विभागात आयुक्तपदावर असताना बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. फडणवीस सरकार सत्तेत असताना आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर देखील बेकायदेशीर फोन टॅप केले जात असल्याचा आरोप करण्यात आले होते. काँग्रेस नेते नाना पटोले यांचे फोन कॉल रेकॉर्ड केल्याप्रकरणी मुंबई आणि पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.