ईडी च्या मदतीने झारखंडचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न

0
160

देश, दि. ०३ (पीसीबी) -झारखंडमधील बेकायदेशीर खाणकामाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रांची आणि राजस्थानमधील १० ठिकाणी छापे मारले आहेत. यामध्ये झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे प्रेस सल्लागार अभिषेक प्रसाद यांचा समावेश आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

हजारीबागचे पोलिस उपअधीक्षक राजेंद्र दुबे आणि साहिब गंजचे उपजिल्हाधिकारी राम निवास यांच्यावरही कारवाई झाली आहे. कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित आणखी एका प्रकरणात, ईडीने शनिवारी सोरेन यांना सातव्यांदा समन्स बजावले होते. या समन्सनुसार सोरेन यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली होती. “आम्ही तुम्हाला मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा, २००२ च्या कलम ५० अंतर्गत तुमचे म्हणणे नोंदवण्याची ही शेवटची संधी देत ​​आहोत. ही नोटीस/समन्स मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत उत्तर देणे आवश्यक आहे”, असे ईडीने म्हटले नोटिशीत म्हटलं होतं.

परंतु, सोरेन यांनी या समन्सला बेकायदेशीर म्हटले आहे, अशी बातमी एएनआयने मंगळवारी दिली. ईडीला लिहिलेल्या पत्रात, सोरेन म्हणाले की त्यांनी आधीच त्यांच्या मालमत्तेचा तपशील दिला आहे. “सोरेन यांनी त्यांना बजावलेल्या समन्सच्या उत्तरात ईडीला पत्र लिहिले असून, समन्स बेकायदेशीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी ईडीवर या संपूर्ण प्रकरणाची मीडिया ट्रायल केल्याचा आरोप केला. त्यांच्या उत्तरात त्यांनी सांगितले की, त्यांनी संपत्तीचा तपशील आधीच दिला आहे. ईडीकडून त्यांचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही सोरे यांनी केला”, असं एएनआयने वृत्त दिलं होतं.

साहेबगंज जिल्ह्यातील बेकायदेशीर खाण प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या आरोपांवर सोरेन यांची चौकशी केली जात आहे. खाण आणि भूगर्भशास्त्र विभागाचे प्रभारी असताना हेमंत सोरेन यांनी २०२१ मध्ये स्वतःसाठी खाण लीजवर घेऊन निवडणूक नियमांचं उल्लंघन केलं आहे, असाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला. परंतु, सोरेन यांनी हा आरोप नाकारला आहे. आदिवासी नेत्याला त्रास देण्याचं षडयंत्र असल्याचं ते म्हणाले.