प्रसाद गायकवाड यांना ‘भ्रष्टाचार भूषण’ पुरस्कार द्या-संभाजी ब्रिगेडची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0
228

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेचा वाकडमधील टीडीआर घोटाळा नुकताच उघडकीस आला.या घोटाळ्यामुळे महापालिकेचे तब्बल दीड हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले तर यामुळे महानगरपालिकेची राज्यात मोठ्या प्रमाणात बदनामी झाली. या भ्रष्टाचारामुळे नगररचनाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड यांचा मनमानी कारभार संपूर्ण शहराने पाहिला तसेच त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. सन-२०१५ साली याच प्रसाद गायकवाडांना छत्रपती संभाजी नगर महापालिकेच्या नगररचना विभागात पाच लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते.तर ती केस चालू असताना प्रसाद गायकवाड यांच्यासारख्या भ्रष्ट अधिकाऱ्याला पुन्हा पिंपरी महापालिकेच्या नगररचना विभागात नियुक्ती मिळतेच कशी? यावरून ‘आंधळ दळतंय, कुत्र पीठ खातंय’ असा प्रकार दिसून येतोय.त्यामुळे येत्या काळात ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारा सोबतच शासनाच्या वतीने ‘भ्रष्टाचार भूषण’ पुरस्कार देखील सुरू करण्यात यावा आणि त्या पुरस्काराची सुरुवात प्रसाद गायकवाड यांच्या पासून करण्यात यावी,अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतिश काळे यांनी दिला आहे.

याबाबत सतिश काळे यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शरणापूर येथील शेतकऱ्याने त्याच्या तीस गुंठे शेत जमिनीचे रेखांकन मंजूर करण्यासाठी छत्रपती संभाजी नगर महापालिकेच्या नगररचना व मूल्य निर्धारण कार्यालयातील सहायक संचालकाकडे अर्ज केला होता. या कामासाठी त्यांना तत्कालीन सहायक संचालक प्रसाद सोनबा गायकवाड व त्यांच्या सहकार्यांनी पाच लाखांच्या लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.या तक्रारीवरून प्रसाद गायकवाड व त्यांच्या सहकार्याला लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने सन-२०१५ साली अटक केली होती. यावेळी प्रसाद गायकवाड यांच्या घरझडतीमध्ये एक लाख तेरा हजार रुपये रोख १९ तोळे सोने,पुणे येथे ३५ लाखांचा फ्लॅट व पुणे येथील एबीएच बँकेत लॉकर असल्याचे आढळले होते.आज ते प्रकरण न्याय प्रविष्ट आहे.

देश पातळीवर नावाजलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगररचना विभागात अनेक महत्त्वपूर्ण प्रकरणे चालतात.आणि त्याच नगररचना विभागात उपसंचालक पदावर प्रसाद गायकवाड यांची नियुक्ती होते. हि आश्चर्याची बाब म्हणावी लागेल.लाचखोरीत रंगेहाथ पकडल्या गेलेल्या इतक्या संवेदनशील प्रकरणात आरोपी असणाऱ्या व्यक्तीला पिंपरी चिंचवड महापालिकेत नियुक्ती दिलीच कशी जाते? असा सवाल उपस्थित होत आहे. लाचखोरीच्या घटनेची गायकवाड यांच्याकडून वारंवार पुनरावृत्ती होत असेल तर हा अधिकारी महापालिकेत केवळ धनसंपदा कमाविण्याच्या हेतूने आल्याचे दिसून येत आहे. या संपूर्ण घटनांवरून आगामी काळातही त्यांच्या हातून अशाच प्रकारचे मोठे भ्रष्टाचार होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. नगररचना विभागाच्या अखत्यारीत येणार्या अनेक प्रकरणांमध्ये अनियमितता दिसून येत आहे. त्यांच्या नियुक्तीपासून ते आजपर्यंतच्या कालावधीमधील प्रकरणात त्यांनी पदाचा व अधिकाराचा सर्रासपणे गैरवापर केला आहे. सदरील व्यक्तीने आतापर्यंत नगररचना विभागात रुजू झाल्यापासून शुल्लक कारणावरून, त्यांनी सांगितलेले नियमबाह्य कामे न केल्याने कर्मचाऱ्यांना सस्पेंड करण्याच्या धमक्या दिल्यात तर अनेक कर्मचाऱ्यांना मेमो दिले आहेत. गायकवाड यांनी केलेले अजून दोन मोठे भ्रष्टाचार आम्ही येत्या काळात पुराव्यासहित उघड करणार आहोत. असा इशारा सतिश काळे यांनी दिला आहे.