महाराष्ट्रात नाही तर, टेस्ला कंपनी गुजराथमध्ये करणार मोठी गुंतवणूक

0
552

गांधीनगर, दि. २९ (पीसीबी) – जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक वाहन उत्पादन कंपनी टेस्ला अखेर भारतात आपला उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. जानेवारी २०२४ मध्ये गुजरातच्या गांधीनगर येथे होणाऱ्या ‘व्हायब्रंट गुजरात समिट’मध्ये याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गुजरातमध्ये परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी दरवर्षी गांधीनगरमध्ये हे जागतिक स्तरावरील समिट आयोजित करण्यात येत असते. यंदा याचे दहावे वर्ष आहे. गुजरातमधील माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार टेस्ला कंपनीचे अधिकारी आणि गुजरात सरकार यांच्यातील चर्चा अखेरच्या टप्प्यात आली असून लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क हे स्वतः यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे, अशी बातमी अहमदाबाद मिररने दिली आहे.

टेस्ला कंपनीची आयात शुल्क कपात करण्याची मागणी केंद्र सरकारने पूर्ण न केल्यामुळे टेक्सासमधील इलेक्ट्रिक वाहन उत्पादन कंपनी टेस्लाने २०२२ साली भारतात प्रकल्प उभारण्याचा निर्णय बासनात गुंडाळून ठेवला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी अमेरिकेचा दौरा केला असताना टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांनी त्यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांनी भारतात उत्पादन प्रकल्प उभारण्याचे संकेत दिले होते. मध्यंतरी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी अमेरिकेतील टेस्लाच्या एका उत्पादन प्रकल्पाला भेट दिली होती, अशी माहिती हिंदुस्तान टाइम्सने आपल्या बातमीत दिली आहे.

गुजरात समाचार आणि इतर माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील सानंद जिल्ह्यात हा प्रकल्प उभारण्यासाठी टेस्ला कंपनीने रस दाखविला आहे. हा तोच जिल्हा आहे, जिथे टाटा मोटर्सचा वाहन उत्पादन प्रकल्प होणार होता. याशिवाय मारुती सुझुकी आणि एमजी मोटर यासारख्या बड्या कंपन्यांचेही वाहन उत्पादन प्रकल्प गुजरातमध्ये आहेत. आता टेस्लाचा प्रकल्प प्रत्यक्षात अमलात आल्यास गुजरात वाहन उत्पादनाचे मोठे हब ठरू शकते.

गांधीनगरमध्ये होणाऱ्या ‘व्हायब्रंट गुजरात समिट’मध्ये गुजरात सरकार आणि टेस्ला यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. काही काळापूर्वी टेस्लाने जाहीर केले होते की, इलेक्ट्रिक वाहनासाठी लागणाऱ्या बॅटरीचे उत्पादन भारतात घेण्यात येईल. त्यानंतर वाहन उत्पादन करण्याचीही घोषणा करण्यात आली. यावर्षी अखेरीपर्यंत नेमक्या कोणत्या राज्यात वाहन प्रकल्प उभारायचा याबाबतची निश्चिती टेस्लाकडून करण्यात येणार होती. टेस्लाचा प्रकल्प आपल्या राज्यात यावा यासाठी कर्नाटक, महाराष्ट्र, तमिळनाडू आणि तेलंगणा राज्य प्रयत्नशील होते.

माध्यमातील बातम्यांनुसार, गुजरातची निवड करण्यामागे इथे असलेले बंदर कारणीभूत असल्याचे सांगतिले जाते. गुजरातमध्ये वाहन उत्पादन केल्यानंतर ते बंदरमार्गे इतर देशांत निर्यात करण्याची टेस्लाची योजना आहे. सानंद जिल्ह्यापासून कांडला-मुंद्रा बंदरापर्यंत वाहतूक करण्याची सुविधा उपलब्ध असल्यामुळे वाहन निर्यात करणे शक्य होणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. सानंद जिल्ह्यात टेस्ला प्रकल्पासाठी जमिनही उपलब्ध करून दिली जाणार आहे. असे असले तरी अद्याप सानंद जिल्ह्यातच प्रकल्प होईल, यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. गुजरात सरकारकडून मेहसाणा जिल्ह्यातील बेचराजी आणि अहमदाबाद जिल्ह्यातील धोलेरा या शहरांचाही पर्याय टेस्ला कंपनीसमोर ठेवला आहे.