हिंजवडी मधील ॲकॉर्ड ऑटोकॅम्प कंपनीत गॅस भट्टीमध्ये स्फोट; 20 कामगार जखमी

0
376

हिंजवडी, दि. २७ (पीसीबी): हिंजवडी मधील ॲकॉर्ड ऑटोकॅम्प कंपनीमध्ये गॅस भट्टीमध्ये स्फोट झाला. या स्फोटात गॅस भट्टीमध्ये काम करणारे 20 कामगार गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 26) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास घडली.

सागर लक्ष्मण सोलसे (वय 35, रा. घोटावडे) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ॲकॉर्ड ऑटोकॅम्प कंपनीचे मालक प्रशासन तसेच मेंटेनन्सचे काम पाहणाऱ्या इतर इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर आणि त्यांचे इतर 19 कामगार हे कंपनीच्या ऑटोमोबाईल पार्ट्स गॅस भट्टीच्या ओव्हन मशीन मध्ये कोटिंगचे काम करत होते. त्यावेळी गॅस भट्टीमध्ये अचानक स्फोट झाला. या स्फोटात गॅस भट्टीमधील कोटिंग करण्यासाठी ठेवलेली पावडर आणि पार्ट कामगारांच्या अंगावर उडाले. त्यामध्ये 20 कामगार गंभीर जखमी झाले. गॅस भट्टीची देखभाल न केल्याने हा प्रकार घडला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.