मनी लॉॅड्रींग होत असल्याचे भासवून 26 लाखांची फसवणूक

0
321

वाकड, दि. २६ (पीसीबी) – मुंबई येथून तैवानला एक पार्सल जात असून त्यात बेकायदेशीर बाबी आहेत. तसेच तुमच्या नावाने मनी लॉॅड्रींग होत असल्याचे भासवून अज्ञातांनी एका व्यक्तीची 26 लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 23 डिसेंबर रोजी दुपारी वाकड येथे घडला.

याप्रकरणी 31 वर्षीय व्यक्तीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल देव, प्रदीप सावंत, दोन बँक खाते धारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8215440034 या क्रमांकावरून फिर्यादीस कॉल आला. फोनवरील व्यक्ती फेडएक्स कुरिअर मधून बोलत असल्याचे सांगून, फिर्यादी यांच्या नावाने मुंबई ते तैवान असे एक कुरिअर जात आहे. त्यामध्ये मुदत संपलेले पासपोर्ट, कपडे, क्रेडीट कार्ड आणि 950 ग्राम एमडी हा अंमली पदार्थ असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार देण्यास फिर्यादीस सांगण्यात आले. दरम्यान, फिर्यादी यांचा आधार क्रमांक गैरकृत्यांसाठी वापरला जात असल्याचे सांगण्यात आले. फिर्यादी यांच्या नावाने मनी लॉॅड्रींग सुरु असल्याचे भासवून वेगवेगळ्या बँक खात्यांवर 26 लाख 6 हजार 866 रुपये पाठवण्यास आरोपींनी भाग पाडले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.