शिंदे गट आणि अजित पवार यांच्यात लोकसभा उमेदवारीवर घमासान

0
168

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – महाराष्ट्राने गेल्या चार ते पाच वर्षात अनेक राजकीय घडामोडी पाहिल्या. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राला एक अनोख्या युतीचं सरकार बघायला मिळालं. त्यानंतर अडीच वर्षांनी जे घडलं त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र थक्क झाला. तेव्हापासून सुरु झालेल्या राजकीय घडामोडी काही थांबायचं नाव घेताना दिसल्या नाहीत. सातत्याने धक्क्यावर धक्के देणाऱ्या राजकीय घडामोडी घडत गेल्या. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एक वर्षाने महाराष्ट्राच्या जनतेला आणखी एक नवा राजकीय भूकंप बघायला मिळाला. आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्या नेतृत्वातील महायुतीचं सरकार होतं. या सरकारमध्ये आणखी एक विरोधी बाकावरचा सहकारी पक्ष सत्तेत सहभागी झाला आणि सत्ताधाऱ्यांचा समान वाटेकरी बनला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे आमदार सत्तेत सहभागी झाले. त्यांच्या गटाच्या 9 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. असं असताना आता महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या अंकाला सुरुवात होणार आहे. कारण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सत्ताधारी शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात लोकसभा निडणुकीच्या जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु झालीय.

राज्यात सत्तांतर होऊन सव्वा वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे, पण अद्यापही मंत्रिमंडळाचा रखडलेला दुसऱ्या टप्प्यातील विस्तार पार पडलेला नाही. विशेष म्हणजे काही महिन्यांनी लोकसभेच्या निवडणुका आणि नंतर विधानसभेच्या निवडणुका पार पडतील. पण त्याआधी आता लोकसभेच्या जागा वाटपावरुन शिंदे गट आणि अजित पवार गटात रस्सीखेच सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जितक्या जागा शिंदे गटाला देणार, तितक्याच जागा आम्हाला द्या, अशी भूमिका अजित पवार गटाची आहे. लोकसभेसाठी समसमान जागावाटपाची अजित पवार गटाची भूमिका असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभेतही शिंदे गटाप्रमाणेच अजित पवार गटाला जागा मिळाव्यात, असं स्वत: अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी कॅमेऱ्यासमोर स्पष्ट म्हटलं आहे.

अमित शाहांच्या उपस्थितीत शिंदे-अजित पवारांची बैठक होणार, पण त्याआधी…
सध्या अजित पवार गटाचे 4 खासदार आहेत. तर शिंदे गटाचे 13 खासदार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या जानेवारी महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची जागावाटपासाठीची बैठक होणार आहे. लोकसभा बरोबरच विधानसभा निवडणुकीतही अजित पवार गट समसमान जागावाटपासाठी आग्रही आहे, अशी देखील माहिती सूत्रांनी दिलीय. या दरम्यान, याबाबतच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर आज संध्याकाळी बैठक आयोजित करण्यात आलीय. अजित पवारांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे.