आता मुलांच्या नावापुढे आईचे नाव प्रथम, नंतर वडिलांचे

0
229

बारामती, दि. २५ (पीसीबी) – आतापर्यंत आपण मुलांच्या नावापुढे वडिलांचे नाव लागलेले पाहत आलो आहोत. गेल्या काही वर्षांपासून काही लोक उस्फुर्तपणे आपल्या नावापुढे आईचे नाव लावताना दिसतात. सोशल मीडियावर शक्यतो अशी पूर्ण नावे लावलेली दिसतात. अधिकृत कागदपत्रांवरही काही जणांनी आई आणि वडिलांची नावे लावण्याची पद्धत सुरू केली आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असल्याचे नेहमीच बोलले जाते. राज्यात लवकरच चौथे महिला धोरण आणले जाणार आहे. या धोरणानुसार आता मुलांच्या नावापुढे आईचे नाव लावण्याची तरतूद करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चौथ्या महिला धोरणाविषयी भाष्य केले. बारामती येथे ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार केला. यावेळी भाषण करत असताना शरद पवारांपासून वेगळा होण्याचा निर्णय का घेतला? इथपासून ते बारामतीमध्ये आता कुणाचे ऐकायचे? इथपर्यंत अनेक विषयांवर भाष्य केले.

काय म्हणाले अजित पवार?
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखाली चौथे महिला धोरण आणले आहे, ज्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. फार बारकाईने हे धोरण आणले गेले आहे. याआधी मुल जन्माला आल्यानंतर त्याच्या नावापुढे वडिलांचे नाव लावले जायचे. मुलाचे नाव, मग वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव लावले जायचे. आता आपण नवीन निर्णय घेतला आहे. इथून पुढे मुलाचे किंवा मुलीचे नाव, मग आईचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव लावले जाईल.”

महिलादेखील समाजातील महत्त्वाचा घटक आहे, असे सांगताना अजित पवार म्हणाले की, मी अर्थमंत्री असताना विविध निर्णय घेतले. एखाद्या पुरुषाने सदनिका विकत घेतली तर त्यावर सहा टक्के कर लावला जातो, जर महिलेच्या नावावर सदनिका घेतली तर केवळ पाच टक्के कर लावला जातो. त्यामुळे इथून पुढे पती घर घ्यायचा विचार करत असेल तर पत्नीने पैसे वाचविण्यासाठी हा पर्याय पतीपुढे ठेवायला हरकत नाही, असेही अजित पवार मिश्किलपणे म्हणाले. महिला धोरणाच्या बाबतीत टप्प्याटप्प्याने माहिती देऊ, असे त्यांनी जाहीर केले.

ताबडतोड आरक्षण देणे योग्य नाही
मराठा आरक्षणाच्या विषयासंदंर्भात बोलत असताना अजित पवार म्हणाले की, आज राज्यात आरक्षणासंबंधी वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रत्येक समाजाने आपापली मागणी रेटून धरली आहे. संविधानाने प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे. त्या चौकटीत राहून मत मांडावे. आता काहीजणांनी भूमिका घेतली आहे की, आम्ही आता मुंबईत जाणार. त्यांचे म्हणणे आहे की, आरक्षण ताबडतोब द्या. पण असं ताबडतोब आरक्षण दिलं तर ते न्यायालयात टिकणार नाही. मग ‘ईजा-बिजा-तिजा’ सगळ्यांचा सरकारवरून विश्वास उडेल. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालचे सरकार आरक्षण देण्यासाठी मनापासून प्रयत्न करत आहेत.

माझं वय झालंय कुठून आणून मुलं?
बारामतीमधील सरपंच आणि उपसरपंचाशी संवाद साधत असताना मतदारसंघातील लोकांनी केलेल्या मागणीचा उल्लेख करत अजित पवार यांनी मिश्किल टिप्पणी केली. बारामतीच्या खराडवाडी येथे महाविद्यालय काढा अशी मागणी एका कार्यकर्त्याने केली होती. त्यावर गमतीशीर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, खराडवाडी केवढी, तिथं महाविद्यालय उघडून विद्यार्थी कुठून आणणार. कार्यकर्ता म्हणाला, तुम्हीच आणायचे विद्यार्थी. यावर अजित पवार म्हणाले, आता माझं वय झालं नाहीतर आणलीच असती. मी इतके शांत डोके ठेवून काम करत असतो, तरी काही लोक चिडायला लावतातच, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.