अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २० लाखाचा निधी

0
157

पुणे, दि. २३ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड येथे होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २० लाखाचा निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी शासनातर्फे १० कोटी रुपये देण्यात येणार आहे. या संमेलनासाठी आमदार निधीतून प्रस्ताव आल्यास मान्यता देण्यात येईल. नाट्य संमेलनासाठी मंडप अत्यंत उत्तम दर्जाचा असावा. नाट्य कलावंतांना आवश्यक सर्व सुविधा पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उपलब्ध करून द्याव्यात. सर्वांच्या स्मरणात राहील असे आयोजन करावे, अशी सूचना त्यांनी केली.

मंत्री उदय सामंत म्हणाले, संमेलनासाठी आवश्यक पूर्वतयारी करण्यात आली आहे. सामाजिक उत्तरदायित्व निधीतूनही संमेलनाला सहकार्य करण्यात येईल. यावेळी भाऊसाहेब भोईर यांनी नाट्य संमेलनाविषयी माहिती दिली.