स्कूल बस अंगावरून गेल्याने चालक ठार

0
231

चाकण, दि. २२ (पीसीबी) – स्कूल बसचा गिअर अडकल्याने तो काढण्यासाठी चालक बसच्या खाली गेला. दरम्यान त्याने एका महिलेला बस चालू करण्यास सांगितले. त्यावेळी महिलेने हयगयीने बस चालू केली. त्यावेळी बसच्या खाली असलेल्या चालकाच्या अंगावर बसचे चाक गेले. त्यात चिरडून चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि. 21) सकाळी आठ वाजता चाकण येथील गवते वस्ती येथे घडला.

सुनील वामन खिलारी (रा. राजगुरूनगर, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय सुनील खिलारी (वय 27) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील सुनील खिलारी हे स्कूल बसवर (एमएच 14/सीडब्ल्यू 1404) चालक म्हणून काम करत होते. गवते वस्ती येथे बसचा रिव्हर्स गिअर अडकल्याने बस बंद पडली. तो गिअर काढण्यासाठी सुनील हे बसच्या खाली गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी बसमधील महिलेला बस सुरु करण्यास सांगितली. महिलेकडे बस चालविण्याचा परवाना नसताना हयगयीने तिने बस सुरु केली. दरम्यान बस रिव्हर्स गेली. बसचे चाक सुनील यांच्या अंगावरून गेले आणि त्यात ते गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडले. बस रिव्हर्स जाऊन परिसरातील घरांवर आदळली. यात घरांचे देखील नुकसान झाले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.