नवीन उभरत्या स्टार्टअप, गुंतवणूकदारांसाठी इन्क्युबेशन सेंटर व्यासपीठ ठरेल – आयुक्त शेखर सिंह

0
160

पिंपरी चिंचवड इन्क्युबेशन सेंटर कार्यालयाचे उदघाटन

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड शहराच्या परिसरात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित स्टार्ट अप युनिटची सुरुवात करण्यासाठी सल्ला आणि मार्गदर्शन देणे, स्टार्ट अपला सहाय्य करणे, या मुख्य उद्देशाने पिंपरी चिंचवड इन्क्यूबेशन सेंटर उभारण्यात आले आहे. या माध्यमातून नव्या उभरत्या स्टार्टअप्सला गुंतवणूकदार, तज्ञ मार्गदर्शक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन मिळण्याच्या दृष्टीने चिंचवड येथील पिंपरी चिंचवड इनक्युबेशन सेंटर एक व्यासपीठ ठरणार आहे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले. ऑटो क्लस्टर येथे पिंपरी चिंचवड इन्क्यूबेशन सेंटर कार्यालयाचे उदघाटन आयुक्त सिंह यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरचे अध्यक्ष दीपक करंदीकर, महासंचालक प्रशांत ‍गिरबाने, ऑटो क्लस्टरचे व्यवस्थापकीय संचालक किरण वैद्य, संचालक ‍दिपक महेंद्र, रेजी मथाई, सुधीर आगाशे, व्यवस्थापक उदय देव, आदित्य मासरे यांच्यासह इन्क्युबेटर्स उपस्थित होते. प्रसंगी, आयुक्त सिंह यांनी नव स्टार्टअप सोबत चर्चा करून स्टार्टअप संदर्भात माहिती घेतली.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, “नवीन व्यवसायांमधील अंतर भरून काढण्यासाठी नव उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध आमचा भर आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सर्वात अनुकूल स्टार्टअप इको-हब तयार करून त्यांना योग्य मार्गदर्शक आणि गुंतवणूकदारांसोबत संरेखित करण्याबाबतचे उद्दिष्टये ठेवण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडच्या आगामी उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी स्टार्टअप योजना राबविली जात आहे. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड मार्फत शहरातील नवउद्योजकांच्या मार्गदर्शनासाठी दि. १४ नोव्हेंबर २०१९ रोजी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड, ऑटो क्लस्टर डेव्हलपमेंट अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट व मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रिकल्चर यांचे संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड इन्क्यूबेशन सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. इन्क्यूबेशन सेंटर अंतर्गत सध्या ५० स्टार्टअप कार्यरत आहेत. तसेच, १८ विविध क्षेत्रातील मार्गदर्शकांची टीम देखील कार्यरत आहे. या व्यतिरिक्त विविध उपक्रमांच्या अंतर्गत अभियांत्रिकी विषयाशी संबंधित प्रशिक्षण, सेमिनार्स, कार्यशाळा, बाजारपेठेमध्ये उत्पादनाचे विपणन (मार्केटिंग) या विविध विषयांसंदर्भात या इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाते. जास्तीत जास्त स्टार्टअप्सनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.