180 देशांतील एक लाख गीताप्रेमी करणार 42 तास अखंड गीता पारायण

0
188

पुणे, दि.२२ (पीसीबी) – भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला 5160 वर्षांपूर्वी मोक्षदा एकादशीच्या दिवशी श्रीमद्भगवद्गीता सांगितली होती. यावर्षी मोक्षदा एकादशी 22-23 डिसेंबर रोजी येत आहे. यामुळे गीता परिवाराने अनोखा उपक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमात 180 देशांतील एक लाख गीताप्रेमी सहभागी होणार आहेत. हे गीताप्रेमी सलग 42 तास अखंड गीता पारायण करणार आहेत. शनिवार 23 डिसेंबर रोजी सकाळी 6 ते रविवार 24 डिसेंबर मध्यरात्री 12 वाजेपर्यंत हा ऑनलाइन उपक्रम होणार आहे. गीता परिवाराकडून हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती, बंगाली या भाषांमध्ये ऑनलाइन झूम अ‍ॅपवर हा उपक्रम होणार आहे. यामध्ये 18 वेळा गीतेच्या संपूर्ण 18 अध्यायांचे अखंड पारायण पठण करणार आहे. जगाच्या इतिहासात प्रथमच या गीता जयंतीला असा उपक्रम होत आहे. श्री राम मंदिर जन्मभूमीचे कोषाध्यक्ष आणि गीता परिवाराचे संस्थापक स्वामी श्री गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या हस्ते या उपक्रमास सुरुवात होणार आहे.

1986 मध्ये गीता परिवाराची स्थापना झाली. गीता परिवाराकडून LearnGita उपक्रमांतर्गत गीता वर्ग पूर्णपणे मोफत चालवले जातात. 2020 मध्ये सुरू झालेल्या गीता शिका उपक्रमात 3 वर्षापासून ते 93 वर्षे वयोगटातील लाखो लोक सहभागी झाले आहेत. यासाठी कोणीही Learngeeta अॅपवर किंवा वेबसाईटवर नोंदणी करू शकतात. या उपक्रमात श्रीमद्भगवद्गीतेचे शुद्ध संस्कृत उच्चार प्रशिक्षित शिक्षकांद्वारे मोफत शिकवले जाते. जगभरातील आठ लाख लोक दोन हजार झूम वर्गातून गीता शिकत आहेत.

गीतेच्या 18 व्या अध्यायाच्या 68व्या आणि 69व्या श्लोकात श्री भगवानांनी स्वतः सांगितले आहे की, गीता वाचणारे आणि शिकवणारे सर्व लोक भगवंताला प्रिय आहेत. गीता जयंतीला Learngeeta.com वर ऑनलाइन घरबसल्या तुम्ही या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. उपक्रमात श्लोक लिखित स्वरूपात स्क्रीनवर दिसतील. ऑनलाइन व्यतिरिक्त ऑफलाइन देश-विदेशातील विविध शहरात भक्त गीता पठण करणार आहेत. यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या ठिकाणी गीता वाचनाला उपस्थित राहू शकता. देश-विदेशात 1000 हून अधिक ठिकाणी गीता पठणाचा कार्यक्रम होणार आहे. गीता जयंती कार्यक्रमासंबंधी इतर माहिती learngeeta.com/geetajayanti ला भेट देऊन किंवा टोल-फ्री नंबर 1800 203 6500 वर कॉल करून देखील मिळवता येईल.