खासदार श्रीरंग बारणे यांना संसद महारत्न पुरस्कार जाहीर

0
246

पिंपरी, दि. २१ (पीसीबी)- लोकसभेतील उपस्थिती, जनहिताचे उपस्थित केलेले प्रश्न, चर्चेतील सहभागासाठी, खासगी विधेयक आणि अनुकरणीय सर्वोत्तम कामगिरीसाठी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना 17 व्या लोकसभेतही संसद महारत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. पाच वर्षांतून हा पुरस्कार एकदाच दिला जातो. यापूर्वी सोळाव्या लोकसभेतील कामगिरीसाठीसुद्धा खासदार बारणे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाउंडेशन आणि इ- मॅगॅझीनतर्फे दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. 17 फेब्रुवारी 2024 रोजी दिल्ली येथे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना प्राईम पॉईंट फौंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. चालू 17 व्या लोकसभेत खासदार बारणे यांच्या कामगिरीतील सातत्य कायम आहे. त्यांनी 605 प्रश्न विचारले आहेत. 159 चर्चामध्ये सहभाग घेतला तर, 13 खासगी विधेयके मांडली आहेत. खासदार बारणे यांची सभागृहात 94 टक्के उपस्थिती आहे. या कामगिरीसाठी त्यांना पुन्हा एकदा संसद महारत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, याच संस्थेचा संसदरत्न पुरस्कार त्यांना सलग सात वेळा, संसद विशिष्टरत्न पुरस्कार एकवेळा प्रदान करण्यात आला आहे. संसदेतील सातत्यपूर्ण सर्वोत्तम कामगिरी आणि त्याच वेळी आपल्या मतदार संघातील नागरिकांसाठी जनहिताची केलेली कामे यांचा या पुरस्कार निवडीसाठी विचार करण्यात आला आहे.

खासदार श्रीरंग बारणे नेहमी लोकांमध्ये असतात. लोकांना सहज उपलब्ध होणारा, लोकांमध्ये मिळून मिसळून राहणारा खासदार अशी त्यांची मतदारसंघात ख्याती आहे. जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध असतात. नगरसेवक ते खासदार बारणे यांचा असा राजकीय प्रवास आहे. या राजकीय प्रवासात त्यांच्यात कोणताही बदल झाला नाही. आजही ते लोकांना सहज उपलब्ध होतात. जनमानसात मिसळून राहतात. त्यामुळे मतदारसंघातील जनतेने सलग दोनवेळा त्यांच्यावर मोठा विश्वास दाखविला आहे. मोठ्या मताधिक्याने देशाच्या सभागृहात पाठविले आहे. मतदारांचा खासदार बारणे यांच्यावर मोठा विश्वास आहे.

मतदारांच्या विश्वासाला सार्थ ठरलो – बारणे

दोन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील जनतेने दोनवेळा माझ्यावर विश्वास टाकला. मोठ्या मताधिक्याने लोकसभेत निवडून पाठविले, त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी सदैव कार्यरत आहे. गेल्या साडेनऊ वर्षांपासून करत असलेल्या कामाला मिळालेली पावती आहे. हा पुरस्कार माझा नसून मतदारसंघातील जनतेचा आहे. मतदारांच्या विश्वासाला सार्थ ठरलो असल्याची भावना खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली