पोलिसांचे अजब फर्मान, मराठा नेत्यांना ट्रॅक्टर देऊ नका

0
304

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात काही दिवसांपासून सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहेत. मुंबईत मराठा आरक्षणाच्या मोर्चा काढण्यासंदर्भात हे मेसेज आहेत. मराठा बांधवांनी मुंबईतील मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन, यामधून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.

मुंबईतील मोर्चासाठी मराठा समाज ट्रॅक्टरने जाणार असल्याचा संशय नांदेड पोलिसांनी आहे. त्यांनी अजब फर्मान काढलं असून त्यांची चर्चा सुरु आहे. मराठा नेते, किंवा अन्य कोणी ट्रॅक्टर मागण्यासाठी आले तर त्यांना ट्रॅक्टर देऊ नका, अशी नोटीस पोलिसांनी ट्रॅक्टर मालकांना पाठवली आहे.

आपल्याकडे असलेले ट्रॅक्टर हे आपण शेतीसाठीच्या कामासाठी घेतले आहे. त्यांचा वापर शेतीच्या कामासाठीच करा, मराठा आरक्षणासाठी २४ डिसेंबरच्या दरम्यान काही जण मुंबईकडे मोर्चासाठी जाणार असल्याची शक्यता आहे.त्यासाठी मराठा नेते, अन्य नागरिक ट्रॅक्टर मागण्यासाठी येतील, त्यांना ते देऊ नका. तुम्हीही ट्रॅक्टर घेऊन जाऊ नका, अशी नोटीस पोलिसांनी ट्रॅक्टर मालकांना बजावली आहे. या सूचनेचे पालन न केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार पोलिसांनी ट्रॅक्टर चालकांना अशी नोटीस पाठवली आहे .

मराठा मोर्चाची शक्यता असल्याने मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पोलिसांनी मुंबईत कलम 144 लागू केले आहे. यामुळे मुंबईकरांना कुठेही जमाव करता येणार नाही. मुंबई पोलिसांनी ही जमावबंदी मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लागू केल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी विधिमंडळात निवेदन दिल्यानंतर मराठा आंदोलन उभारणारे मनोज जरांगे पाटील यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांनी दिलेली फेब्रुवारीची डेडलाईन फेटाळून लावत जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबरच्या आत मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी भूमिका घेतली.