माझं घर जाळलं, पण त्यात मराठा आंदोलकांचा काही संबंध नाही… – आमदार संदीप क्षीरसागर

0
185

मुंबई, दि. १५ (पीसीबी) – विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. मराठा आरक्षण आणि बीडमध्ये घडलेल्या जाळपोळीच्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा झाली. यावेळी बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीडमध्ये घडलेल्या घटनेचा इतिवृत्तांत दिला. ती घटना मराठा आंदोलकांनी केली नाही, अशी भूमिका संदीप क्षीरसागर यांनी मांडली आहे. क्षीरसागरांनी छगन भुजबळ यांनाही एक आवाहन केलं.

आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले की, बीडमधली जाळपोळीची घटना दुर्दैवी आहे. हल्लेखोरांनी मंदिरसुद्धा फोडली आहेत. माझ्या घरी जाळपोळ झाली, पंडितांच्या घरी दगडफेक केली तिथून बस स्थानकातही दगडफेक केली आणि मग ते निवांतपणे निघून गेले. या घटनेचा मास्टरमाईंड कोण आहे, हे तपासणं गरजेचं आहे

क्षीरसागर पुढे म्हणाले, छगन भुजबळ साहेबांनी घरी भेट दिली, आपले कौटुंबिक संबंध आहेत. परंतु एक आमदार म्हणून प्रामाणिकपणे सांगतो, या घटनेत मराठा समाजाच्या आंदोलकांचा कुणाचाही संबंध नाही. इतर समाजाचाही संबंध नाही. ते गावगुंड होते, ते कुणाशी ना कुणाशी निगडीत होते, यांचे कॉल रेकॉर्ड काढले तर ते कुणाशी बोलत होते ते लक्षात येईल.

काय म्हणाले संदीप क्षीरसागर?
बीडचा प्रकार पूर्ण महाराष्ट्राने बघितला. त्यानंतर ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. माझं घर जळालं आहे, माझा मुलगा अडचणीत होता. भुजबळांना विनंती आहे की, याच्या खोलापर्यंत गेलं पाहिजे. याचा तपास न्यायालयामार्फत केला पाहिजे.. तशी मागणी केली पाहिजे.

माझं घर आणि बीड जेव्हा जळत होतं, त्या सात ते आठ तासात पोलिस प्रशासन तिथं का आलं नाही. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी खडसेंची तब्येत खराब झाली तर एअर अॅम्ब्युलन्स पाठवली. परंतु माझं घर आणि माझं शहर सात ते आठ तास जळत होतं.. पोलिस मुख्यालय माझ्या घरासमोर होतं.. पोलिसांनी का योग्य कारवाई केली नाही? पोलिसांचाही याच्यात दोष नाहीये. परंतु त्या सात ते आठ तासात त्यांचे हात कुणी बांधले होते?. गृहमंत्र्यांनी याबाबत न्यायालयीन चौकशी लावावी, अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली आहे