नारायणगावात आठ बांगलादेशी नागरिकांना ATS ने घेतले ताब्यात

0
269

नारायणगाव, दि. १५ (पीसीबी) – महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने म्हणजेच ATS ने पुणे जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. ATS नारायणगाव परिसरात कारवाई करत बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या आठ बांगलादेशी नागरिकांना पकडले आहे.

पकडलेल्या बांगलादेशी नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता त्यांची एटीएसकडून चौकशी करण्यात येत आहे. बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांद्वारे भारतात घुसखोरी केल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. बांगलादेशी नागरिक नारायणगाव परिसरात मजुरी करत असल्याची माहिती तपासात मिळाली आहे.

नारायणगाव परिसरात बांगलादेशी नागरिक बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. त्यानंतर एटीएसच्या पथकाने गुरुवारी आठ बांगलादेशी नागरिकांना नारायणगाव परिसरातून ताब्यात घेतले.

आठवड्यापूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि एटीएसने पुणे, ठाणे परिसरात कारवाई करुन आयसिसच्या दहशतवादी विचारधारेचा प्रसार करणाऱ्या 15 जणांना ताब्यात घेतले होते. याप्रकरणात कोंढव्यातील दोघांची चौकशी करण्यात आली होती.

पुण्यात बुधवार पेठेत काही बांगलादेशी महिला बेकायदा राहत असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. तीन महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांना बुधवार पेठेतील देहविक्री करणाऱ्या वस्तीत कारवाई करुन बांगलादेशी महिलांसह साथीदारांना ताब्यात घेतले होते. बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते.