दिया कुमारी आणि प्रेमचंद्र बैरवा उपमुख्यमंत्री होणार
नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – छत्तीसगड, मध्य प्रदेशनंतर आता राजस्थानमध्येही भाजपने धक्कातंत्र कायम ठेवत मुख्यमंत्रिपदासाठी नवीन चेहऱ्यालाच पसंती दिली आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी आता भजनलाल शर्मा यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा केली आहे. राजस्थानमध्ये १९९ पैकी ११५ जागांवर विजय मिळवूनही भाजपाला मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित करता आले नसल्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले होते.
मध्य प्रदेश आणि छत्तीसगडप्रमाणेच राजस्थानमध्ये भाजप धक्का देणार की चर्चेतील नावांवर शिक्कामोर्तब होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.सोमवारी झालेल्या आमदारांच्या बैठकीत वसुंधरा राजे शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले. त्यानंतर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, विनोद तावडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भजनलाल शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तर मध्य प्रदेशनंतर राजस्थानमध्येही दोन उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. यात दिया कुमारी आणि प्रेमचंद्र बैरवा यांना उपमुख्यमंत्री, आणि वासुदेव देवनानी यांच्या नावाची विधानसभेचे अध्यक्ष म्हणून घोषणा केली.
भाजपने (BJP) मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये सर्वांनाच धक्का दिला. मध्य प्रदेशात मोहन यादव व छत्तीसगडमध्ये विष्णुदेव साय यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकण्यात आली आहे. ही दोन्ही नावांवर राजकीय वर्तुळात अजिबात चर्चा नव्हती. मात्र, आमदारांच्या बैठकीत अचानक ही नावे समोर आणत भाजपने राजकीय खेळी खेळली. हीच खेळी राजस्थानमध्ये भाजपने केली.
राजस्थानमध्ये बहुमताचा जादुई आकडा गाठत सत्ता मिळवल्यानंतर मुख्यमंत्रिपदाच्या प्रबळ दावेदार म्हणून वसुंधराराजे शिंदे यांच्याकडे पाहिले जात होते.अखेरपर्यंत भाजपकडून राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाबाबत सस्पेन्स कायम राखला गेला होता.अखेरच्या क्षणापर्यंत आत्तापर्यंत तीनवेळा मुख्यमंत्री पदी राहिलेल्या वसुंधरा राजेंनाच पुन्हा एकदा संधी देईल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. पण भाजप नेतृत्वाने हा अंदाज फोल ठरवत राजस्थानमध्ये मोठा धमाका करत नवीन चेहऱ्याला संधी दिली. वसुंधरा राजेंना अलगद बाजूला सारत भाजपने अनपेक्षितपणे भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा केली. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते राजनाथ सिंह यांनी भजनलाल शर्मा यांचे नाव जाहीर केले.
नवे मुख्यमंत्री झालेले भजनलाल शर्मा हे मूळचे भरतपूरचे आहेत. ते सांगानेर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांच्यावर मतदारसंघाबाहेरचा उमेदवार असा ठपकाही ठेवण्यात आला होता. पण असे असतानाही शर्मा यांनी सांगानेरमधून काँग्रेसच्या पुष्पेंद्र भारद्वाज यांनी 48,081 मतांनी पराभूत केले. भजनलाल शर्मा हे संघ आणि भाजप संघटना या दोघांच्याही जवळचे असल्याचे बोलले जाते. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये तुमचे विश्लेषण चुकीचे ठरले आहे. आता राजस्थानमध्येही सरप्राईजसाठी तयार राहा. असे संकेत भाजपचे ज्येष्ठ आमदार किरोडी लाल मीणा यांनी दिले होते. त्यातच त्यांनी सरप्राईजचे संकेत दिल्याने तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत.