मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना लोकसभेच्या पीठासीन अधिकारी पदाचा बहुमान

0
322

तालिका अध्यक्षपदी नियुक्ती, लोकसभा अध्यक्षा ओम बिर्ला यांनी केली घोषणा

पिंपरी, दि. ८ (पीसीबी)- देशाचे सर्वोच्च सभागृह असलेल्या लोकसभेच्या सभागृहात पीठासीन अधिकाऱ्याचे कामकाज करण्याची संधी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना मिळणार आहे. बारणे यांची तालिका अध्यक्षपदाच्या पॅनेलवर नियुक्ती करण्यात आली. लोकसभा अध्यक्षा ओम बिर्ला यांनी सभागृहात बारणे यांच्या नावाची घोषणा करताच सभागृहातील सदस्यांनी बाके वाजवून त्यांचे स्वागत केले.

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी तालिका अध्यक्षांचे पॅनेल जाहीर केले. सभागृहात अध्यक्ष उपस्थित नसल्यास उपाध्यक्ष कामकाज पाहतात. परंतु, लोकसभेत उपाध्यक्षाची निवड करण्यात आली नाही. त्यामुळे अध्यक्षांच्या अनुउपस्थित तालिका अध्यक्षच कामकाज पाहतात. सभागृहातील कामकाजातील चमक, अनुभव आणि ज्येष्ठता या निकषांवर तालिका अध्यक्षांची निवड केली जाते. लोकसभा अध्यक्षांनी खासदार श्रीरंग बारणे यांची तालिका अध्यक्षांच्या पॅनेलवर निवड केली आहे. त्यामुळे बारणे यांना पीठासीन अधिकाऱ्याचे कामकाज करण्याची संधी मिळणार आहे.

खासदार बारणे हे सलग दुस-यावेळी खासदार आहेत. 2014 पासून ते मावळचे प्रतिनिधीत्व करतात. सभागृहाच्या कामकाजात त्यांची शंभर टक्के उपस्थिती असते. विविध चर्चेमध्ये सहभाग, मतदारसंघातील प्रश्न विचारण्यामध्ये ते आघाडीवर असतात. या कामगिरीमुळे त्यांना सलग सातवेळा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आता तालिका अध्यक्षपदी निवड झाल्याने मावळच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

याबाबत बोलताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, भारतीय लोकशाहीचा गाभारा असलेल्या सर्वोच्च सभागृहात अनेक महान नेत्यांनी योगदान दिले आहे. वैभवशाली परंपरा असलेल्या लोकसभेचे पीठासीन म्हणून कामकाज चालविण्याची संधी मिळणे, हे मी माझे भाग्य समजतो. सभागृहाच्या महान परंपरेचे वैभव व गरिमा अबाधित ठेवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. मावळच्या जनतेमुळेच मला या पदावर काम करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे मतदारांसह, तालिका अध्यक्षांच्या पॅनेलवर निवड केल्याबाबत लोकसभेच्या अध्यक्षांचे आणि शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मी आभार मानतो.