मराठा आरक्षणाचा प्रश्न हिवाळी अधिवेशनात मार्गी लावावा

0
238
  • शहरातील आमदारांकडे मराठा क्रांती मोर्चाची मागणी

    पिंपरी, दि. ५ (पीसीबी)-मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सात तारखेपासून नागपूर येथील येत्या हिवाळी अधिवेशनात मार्गी लावावा असे निवेदन आज पिंपरी चिंचवड शहरातील सर्व आमदारांना सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा पिंपरी चिंचवड यांच्या वतीने प्रत्यक्ष भेटून देण्यात आले.

    सर्वांनी आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा असून ही योग्य मागणी आहे. हा प्रश्न नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मार्गी लावण्यासाठी पाठ पुरवा करण्याचे आश्वासन शहरातील सर्व आमदारांकडून क्रांती मोर्चाच्या शिष्यमंडळास देण्यात आले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळात प्रकाश जाधव,सतीश काळे,वैभव जाधव,प्रकाश बाबर,मीराताई कदम जयराम नाणेकर हे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

    आरक्षणाच्या मागणीचे निवेदन चिंचवड विधानसभेच्या विद्यमान आमदार अश्विनीताई लक्ष्मण जगताप,भोसरीचे विद्यमान आमदार महेश लांडगे,तसेच विधान परिषदेच्या आमदार उमाताई खापरे यांनी मराठा क्रांती मोर्चा चे सदर निवेदन स्वतः उपस्थित राहून स्वीकारले, यावेळी मराठा समाजास कायमस्वरूपी टिकाऊ आरक्षण देण्यासाठी सरकारकडे पाठपुरवठा करणार हिवाळी अधिवेशनात याविषयी आवाज उठवणार असल्याचे आश्वासन शहरातील सर्व आमदारांनी शिष्टमंडळास दिले.

    मराठा समाजास कायमस्वरूपी टिकाऊ असे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या कुणबी नोंदणी तपासून कुणबी दाखले देण्यात यावेत सर्व समाजास न्याय मिळण्यासाठी जातीनिहाय जनगणना करावी आवश्यक असेल तर केंद्र सरकारकडे पाठपुरवठा करून घटना दुरुस्ती करावी अशा मागण्या मराठा क्रांती मोर्चा पिंपरी चिंचवडच्या वतीने निवेदनाद्वारे शहरातील सर्व आमदारांना करण्यात आल्या.