कोण आहेत सुनील कनुगोलू? ज्यांनी एका वर्षात काँग्रेसला दुसरं राज्य जिंकून दिलं

0
245

तेलंग, दि. ३ (पीसीबी) : चार राज्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आणि तेलंगणाच्या विधानसभा निवडणूक निकालाचं चित्र स्पष्ट झालं आहे. चारपैकी तीन हिंदी भाषिक राज्यांमध्ये भाजपने बहुमत मिळवलं आहे. काँग्रेसला एकमेव तेलंगणामधून दिलासा मिळाला आहे. तेलंगणात काँग्रेसचं सरकार स्थापन होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. काँग्रेसला इतर ठिकाणी अपयश येत असताना तेलंगणात यश मिळवून देण्यात बिगर काँग्रेसी व्यक्तीचा हात आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे सुनील कानुगोलू. दोन वर्षांपूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची निवडणुकीच्या रणनितीसंदर्भात भेटही घेतली होती. केसीआर यांनी सुनील यांना आमंत्रित केलं होतं. दोघांमध्ये चर्चाही झाली पण सुनील यांनी केसीआर यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला.

सुनील हे नुकतेच तामिळनाडुच्या निवडणुकीतून मोकळे झाले होते्. त्यामुळे नवी जबाबदारी घ्यायला सज्ज होते. अनेक दिवस बैठक झाल्यानतंर केसीआर राव यांच्यासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अचानक सर्वांना धक्का देत काँग्रेसच्या निवडणूक रणनिती समितीच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली. ज्या केसीआर यांच्यासोबत निवडणुकीबद्दल चर्चा केली त्यांच्याच विरोधात आता रणनिती ते आखणार होते. विधानसभा निवडणूक निकालानंतर केसीआर यांना त्यांच्या या निर्णयाचा पश्चाताप होऊ शकतो.

काँग्रेसमध्ये आल्यानंतर सुनील यांनी कर्नाटक आणि तेलंगणा या दोन विधानसभा निवडणुकीसाठी काम सुरू केलं. मे महिन्यात कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या विजयात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचवेळी तेलंगणातही ते काम करत होते. काँग्रेसला इथं मोठा फटका बसला होता. अंतर्गत संघर्षाचेही आव्हान असताना सुनील यांनी केसीआर यांना हरवू शकतो असं सांगितलं होतं. पण अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या.

भाजपने काँग्रेसला तिसऱ्या स्थानावर ढकलू अशी भिती घातली होती. त्यानतंर सुनील यांनी काम सुरू केलं आणि राज्यातील पक्षात सुधारणा केल्या. कर्नाटकप्रमाणेच केसीआर यांना बॅकफूटवर टाकलं. केसीआर यांनी सुनील यांच्यामागे पोलीसही लावले. हैदराबादमध्ये त्यांच्या कार्यालयावर छापा टाकला गेला. सुनील यांची चौकशीही झाली. इतकं होऊनही सुनील यांनी आपलं काम सुरूच ठेवलं.

सुनील कोनुगोलू हे फक्त बडबडत नाहीत, ते माध्यमांसमोर येत नाहीत, फोटो नाही, एकटेच आणि शांतपणे त्यांचं काम करत राहतात. काँग्रेसमध्ये ते सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून आता समोर येत आहेत. निवडणुकीसंदर्भात थेट राहुल गांधींना सल्ला देतात.

तेलंगणात त्यांनी आतापर्यंतची सर्वोत्तम अशी कामगिरी केली. मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीतही ते होते. कर्नाटकची निवडणूक आव्हानात्मक होती पण त्याहून कठीण तेलंगणाचे आव्हान होते. भाजपचे वोट शेअरिंग हे केसीआर यांना सत्तेत राहण्यासाठी फायद्याचं होतं त्यामुळे त्यांनी सुरुवातीलाच राज्यात भाजपचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला.

वाय एस आर यांची मुलगी वाय एस शर्मिला यांना तेलंगणात त्यांचे उमेदवार उभा करण्यापासून रोखण्याचं शिवधनुष्यही सुनील यांनी पेललं. शर्मिला यांना केसीआर यांनी अटकेची धमकी दिली होती. चंद्राबाबू नायडू हेसुद्धा तेलंगणाच्या निवडणुकीतून मागे सरले आणि सुनील यांचा रस्ता सोपा झाला. भाजपला मागे सारत थेट केसीआरशी लढाई सुरू केली. त्यामुळे मतविभाजन टाळण्यात यश मिळाले.

सुनील यांनी गेल्या वर्षी कन्याकुमारी ते काश्मीर अशी राहुल गांधींची भारत जोडो यात्राही यशस्वी करून दाखवली. केसीआर यांनी जेव्हा चौकशीचा ससेमिरा मागे लावला तेव्हा सुनील यांनी चौकशीला जात असताना माध्यमांकडे लक्षही दिले नाही. चौकशी झाल्यानंतर वाढलेली दाढी आणि हलक्या रंगाची जिन्स घातलेली व्यक्ती सुनील असल्याचं समजलं. सुनील यांनी म्हटलं की, मला नेहमीच मदत मिळाली. माझी पद्धत खूपच सरळ आहे. मला जिंकायचं आहे आणि मला कोणत्या प्रचार किंवा कौतुकाची गरज नाही. जे मला ओळखतात ते माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत.

सुनील हे सध्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये ओळखले जातात. त्यांनी स्वत:ला काँग्रेससाठी गरजेचं बनवलं आहे. मूळचे कर्नाटकच्या बेल्लारीचे असलेले सुनील चेन्नईत जन्मले आणि वाढले. अमेरिकेतून त्यांनी उच्च शिक्षण घेतलं त्यानंतर एक ग्लोबल कन्सल्टिंग फर्म मॅकिन्ससोबत काम केलं.