आता सगळ्यात मोठा पनवती कोण ? – सीटी रवी

0
130

देश,दि.०३(पीसीबी) – छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपानं जोरदार मुसंडी मारली आहे. राजस्थान आणि छत्तीसगडसारखी राज्ये काँग्रेसच्या हातून जाण्याची शक्यता आहे. अशातच भाजपा नेते सीटी रवी यांनी काँग्रेसचे नेते, राहुल गांधी यांना टोला लगावला आहे. “आता सगळ्यात मोठा पनवती कोण?” असा सवाल सीटी रवी यांनी उपस्थित केला आहे.

छत्तीसगडमध्ये भाजपा ५३ तर काँग्रेस ३५ जागांवर आघाडीवर आहे. तर, तेलंगणात काँग्रेस ६३ आणि भारत राष्ट्र समिती ( बीआरएस ) ४२ आणि भाजपाचे ९ उमेदवार आघाडीवर आहेत. मध्य प्रदेशात भाजपा १६२ तर काँग्रेस ६५ आघाडीवर असल्याचं दिसत आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. भाजपा ११२ तर काँग्रेस ७२ जागांवर आघाडीवर आहे. यावरून सीटी रवी ‘एक्स’ अकाउंटवर एक ट्वीट केलं आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसला मेन्शन करत “आता सगळ्या मोठा पनवती कोण?” असा सवाल सीटी रवी यांनी उपस्थित केला आहे. विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला होता. त्यानतंर राजस्थानमधील बायतू येथील प्रचारसभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘पनवती’ असे संबोधून टीका केली होती.

“आमचे खेळाडू तिथे चांगले जिंकणार होते, पण पनवतीमुळे त्यांचा पराभव झाला. टीव्हीवाले हे सांगणार नाहीत, पण जनतेला सर्व माहीत आहे,” असं राहुल गांधी म्हणाले होते. हाच संदर्भ घेऊन सीटी रवी यांनी राहुल गांधींना लक्ष्य केलं आहे.